रत्नागिरी : शालेय परिसरात सहज उपलब्ध होणारे साखरयुक्त पदार्थ, पेये, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ यांच्या अतिरेकी सेवनामुळे मुलांमध्ये मधुमेहाची लक्षणे वाढत आहेत. मुलांच्या आरोग्यावर त्याचे दीर्घकालीन परिणाम होतात, असे ज्येष्ठ शिक्षिका प्रियांका चव्हाण यांनी सांगितले.
करबुडे-लाजुळ माध्यमिक विद्यालयात आयोजित ‘मधुमेह म्हणजे काय?’ या विषयावरील मार्गदर्शन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. राष्ट्रीय बालअधिकार संरक्षण आयोग आणि कोकण विभागीय मंडळातर्फे हा कार्यक्रम आयोजित केला होता. मधुमेहाचे गांभीर्य व प्रतिबंधात्मक उपाययोजना, जंकफूड व त्याचे शरीरावर होणारे विपरीत परिणाम यावर त्यांनी सविस्तर माहिती दिली. विज्ञानशिक्षक अभिजित जोशी यांनी मधुमेहाची समस्या आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय यावर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक महेंद्र कुवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या ‘शुगर बोर्ड’ची स्थापना करण्यात आली. सूत्रसंचालन बाहुबली नाईक यांनी केले, तर गजमल बहिरम यांनी आभार मानले. दरम्यान, करबुडे येथील डॉ. अमोल झोरे यांचे व्याख्यानही विद्यालयात आयोजित करण्यात आले होते. डॉ. अमोल झोरे यांनी जंकफूड आणि त्याचे मुलांवर होणारे विपरित परिणाम याबाबत मार्गदर्शन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:12 PM 31/Jul/2025














