Breaking : रत्नागिरीतील घरफोड्यांनी खळबळ: दिवसाढवळ्या दोन सदनिका फोडल्या!

रत्नागिरी : रत्नागिरी शहराच्या मध्यभागी असलेल्या जयस्तंभ परिसरातील खारेघाट रोडवर भरदिवसा दोन सदनिका फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचे दागिने आणि रोकड लंपास केली आहे. सकाळी ९ ते ११ या वेळेत ही धक्कादायक घटना घडल्याने रत्नागिरीकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जयस्तंभ येथील खारेघाट रोडवरील एका इमारतीमधील साळवी आणि चौहान यांच्या सदनिकांना चोरट्यांनी लक्ष्य केले. दोन्ही सदनिकांचे कडी-कोयंडे उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि घरातील मौल्यवान वस्तू लंपास केल्या.

या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून तपासाला सुरुवात केली आहे. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते. भर वस्तीत, दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीमुळे रत्नागिरी शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर