१ ते ७ ऑगस्ट दरम्यान महसुल सप्ताहाचे आयोजन

राजापूर : महसूल विभागामार्फत राज्यात दिनांक ०१ ते ०७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत महसूल सप्ताह २०२५ साजरा करण्यात येत आहे. त्याअनुषगाने सन २०२५-२०२६ या महसुली वर्षामध्ये महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करणेसाठी शासनाकडून प्रत्येक मंडळात महाराजस्व अभियान राबविणेबाबत निर्देश दिलेले आहेत.

महसूल सप्ताहामध्ये प्रत्येक दिवशी कार्यालयामार्फत समाजाच्या विविध घटकांतील नागरिकांसाठी विशेष मोहिम / कार्यक्रम उपक्रम / शिबीरे / महसूल अदालती यांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याअनषंगाने राजापूर तालुक्यामध्ये ही सर्व मंडळ अधीकारी स्तरावर प्रत्येकदिवशी दिलेल्या कार्यक्रमाच्या स्वरुपानुसार अंमलबजावणी करण्याबाबत आदेश पारीत करण्यात आलेले आहेत.

शुक्रवार दि. १ ऑगस्ट रोजी महसुल दिन साजरा करणे व महसूल सप्ताह शुभारंभ अंतर्गत महसूल संवर्गातील कार्यरत /सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी संवाद, उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी पुरस्कार वितरण व मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र वितरण समारंभाचे आयोजन करण्यात येणार आहे. २ ऑगस्ट रोजी शासकीय जागेवर सन २०११ पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबांपैकी अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना सदर अतिक्रमित जागांचे पट्टे वाटप करणेबाबत कार्यक्रम राबविला जाणार आहे.

३ ऑगस्ट रोजी पाणंद शिवरस्त्यांची मोजणी करुन त्यांच्या दुतर्फा झाडे लावणे उपक्रम राबविण्यात येणार आहे. सोमवार दि. ४ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळनिहाय राबविणेत येणार आहे. दि. ५ ऑगस्ट रोजी विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी करुन डीबीटी करुन अनुदानाचे वाटप करणेत येणार आहे. दि. ६ ऑगस्ट रोजी शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे निष्कासित करणे व त्या अतिक्रमणमुक्त करणे तसेच शर्तभंग झालेल्या जमिनींबाबत शासन धोरणानुसार निर्णय घेणेची कार्यवाही केली जाणार आहे. तर गुरूवार दि. ७ ऑगस्ट रोजी M-Sand घोरणाची अंमलबजावणी करणे व नवीन मानक कार्यप्रणालीप्रमाणे (SOP प्रमाणे) धोरण पूर्णत्वास नेणे आणि महसूल सप्ताह सांगता समारंभ आयोजित केला जाणार आहे.

तरी वरील नमुद केलेल्या दिनांकास क्षेत्रिय स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या ठिकाणी महसुल मंडळातील नागरीकांनी आवश्यकत्या कागदपत्रासह उपस्थित राहून महसुल विषयक विविध सेवा दाखले प्रमाणपत्र यांचा लाभ घ्यावा व महसुल प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन तहसिलदार विकास गंबरे यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:26 PM 31/Jul/2025