वाशिष्ठी नदीत उडी घेतलेल्या ‘त्या’ दाम्पत्याचा शोध सुरू

चिपळूण : वाशिष्ठी नदीत उडी घेतलेल्या दाम्पत्याचा दुसऱ्या दिवशीही दाभोळ खाडीत शोध सुरू होता. खाडीकिनारील सर्व गावांमध्ये याबाबतची माहिती देण्यात आली होती. एनडीआरएफ पथकासह अहिरे यांच्या नातेवाइकांनी बोटीच्या माध्यमातून खाडीत शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता.

मूळचे साक्री धुळे येथील नीलेश अहिरे व पत्नी अश्विनी अहिरे यांनी गाधारेश्वर येथील पुलावरून वाशिष्ठी नदीत उडी घेतल्याची घटना बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास घडली होती. तेव्हापासून एनडीआरएफ पथक, पोलिस, शासकीय अधिकारी व कर्मचारी, अहिरे यांचे नातेवाईक वाशिष्ठी नदीसह दाभोळखाडीत त्यांचा शोध घेत आहेत. नीलेशचे वडील शासकीय सेवेत नोकरीला असून त्याला एक लहान भाऊ आहे. दहावीनंतर ते गाव सोडून चिपळूणला नातेवाइकांकडे आले होते. मोबाईल दुरुस्तीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी मोबाईल शॉपी सुरू केली होती. गावाकडील अश्विनी हिच्या सोबत त्यांचा मे २०२५ मध्ये विवाह झाला.

बुधवारी नीलेश हे नेहमीच्या वेळेत मोबाईल शॉपीमध्ये आले होते. सकाळीच त्यांनी नातेवाइकांनी संपर्क साधून घरी जाऊन येण्यास सांगितले. तत्काळ त्यांनी घर गाठले असता तेथे पत्नी घरी नसल्याचे निदर्शनास आले.

तिचा शोध घेतला असता ती गांधारेश्वर पुलावर असल्याची माहिती नातेवाइकांकडून मिळाली. अश्विनीने आत्महत्या करण्यापूर्वी घरच्या लोकांशी संवाद साधून माहिती दिली होती. दरम्यान, नीलेशनेही दुचाकीने गांधारेश्वर पुलावर धाव घेत पत्नीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती सापडली नाही. पत्नीने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच त्यानेही नदीत उडी मारण्याचा निर्णय घेतला. त्यापूर्वी त्याने नातेवाइकांशी संपर्क साधल्याची माहितीही उपलब्ध झाली. असे टोकाचे पाऊल उचलू नको, आम्ही तुझ्या पाठीशी असल्याचा धीर त्याला दिला. परंतु त्याने थेट नदीत उडी घेतल्याचे समजते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 AM 01/Aug/2025