रत्नागिरी : केंद्र शासनाच्या पथकाकडून तालुक्यातील ग्रामीण योजनांचा आढावा

रत्नागिरी : केंद्र शासनाच्या योजना ग्रामीण भागातील तळागाळातील लोकांपर्यंत योग्यरितीने पोहोचल्या आहेत की नाही याची तपासणी केंद्र शासनाकडून सुरु झाली असून, रत्नागिरी जिल्ह्यात केंद्रीय तपासणी समितीकडून दापोली, चिपळूणपाठोपाठ रत्नागिरी तालुक्यातील गावांना भेटी देऊन तपासणी करण्यात येत आहे. रत्नागिरी तालुक्यातील ग्रामीण भागातील विकास कामांचा आढावा घेताना या समितीच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयमार्फत ग्रामपंचायत पातळीवर अनेक योजना राबवल्या जात आहेत. अगदी कृषी, जलसंधारणापासून घरकूल व अनेक योजनांचा यात समावेश आहे. या योजनांचे मूल्यांकन या समितीमार्फत केले जात आहे. केंद्रीय समितीचे प्रमुख धर्मेश ग्यानी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ग्रामीण भागात राबवल्या जाणाऱ्या प्रत्येक योजनांची गावपातळीवर जाऊन पाहणी करण्यात सुरुवात केली आहे. ग्रामस्थांशी संवाद साधून माहिती घेतली जात आहे. योजना योग्य प्रकारे राबवल्या जात आहेत की नाहीत, काही त्रुटी आहेत का याबाबतही माहिती घेतली जात आहे. घरकुलांची प्रत्यक्ष पाहणी या पथकाकडून केली जात आहे.

दापोली व चिपळूणमधील ग्रामपंचायतींना भेटी दिल्यानंतर हे केंद्रीय पथक सध्या रत्नागिरी तालुक्यातील ग्रामपंचायतींचा आढावा घेत आहे. तालुक्यातील धामणसे या ग्रामपंचायतीला बुधवारी भेट देऊन येथील झालेल्या कामांची माहिती घेतली. गुरुवारी खानू येथील ग्रामपंचायतीला या पथकाने भेट दिली यावेळी या पथकाने घरकूल, गोठा, गांडूळ खत युनिट, महिला बचत गटांचे काजू युनिट यांची पाहणी करतानाच कृषी, जलसंधारण व फळबाग लागवडीचीही माहिती घेतली. केंद्रीय योजनांचा लाभ घेणाऱ्या ग्रामस्थांशी पथकप्रमुख धर्मेश ग्यानी यांनी संवाद साधला. यावेळी रत्नागिरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चेतन शेळके उपस्थित होते. या पथकाने ग्रामसेवक उमेश साळवी यांच्याकडून माहिती घेतली. या पथकाने खानूमध्ये झालेल्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. शुक्रवारी हे पथक मावळंगे गावाला भेट देणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 AM 01/Aug/2025