चिपळूण : नारायण तलाव परिसरातील उद्यानात गवत कुजल्याने सुशोभीकरणाची ऐशीतैशी

चिपळूण : शहरातील नारायण तलाव परिसरातील उद्यानात काही ठिकाणी पाण्याचा निचरा योग्यप्रकारे होत नसल्याने गवत कुजायला लागले आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारास पालिकेने नोटीस दिली असून, पावसाळ्यानंतर त्याची दुरुस्ती होणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. नित्यनेमाने दीर्घकाल रखडलेल्या नारायण तलावाचे सुशोभीकरण झाल्यानंतर या तलावाने शहराच्या वैभवात भर घातली. शहरातील नागरिकांना आजही या तलावाची भुरळ पडत आहे.

येथे फिरायला येणाऱ्यांची संख्यादेखील अधिक आहे. गतवर्षी १८ ऑगस्ट २०२४ रोजी सुशोभीकरण केलेल्या नारायण तलावाचे मंत्र्याच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. तलावांचे शहर म्हणून ओळख असलेल्या चिपळूण शहरात सर्वप्रथम रामतीर्थ तलावाचे सुशोभीकरण झाले होते. त्यानंतर दीर्घकाळाने वीरेश्वर कॉलनीतील वीरेश्वर तलावाचे सुशोभीकरण झाले. यानंतर रामतीर्थ तलाव सुशोभीकरणाचे काम तीन-चार वर्षे सुरू होते. तत्कालीन पालकमंत्री रवींद्र वायकर व विद्यमान मंत्री उदय सामंत यांनी नारायण तलावाच्या सुशोभीकरणासाठी कोट्यवर्षीचा निधी दिला. यामुळे या तलावाचे रूपडेच पालटून गेले. या तलावात चिमुकल्यांपासून ज्येष्ठापर्यंत तसेच महिलांसाठी विविध सेवा सुविधा उपलब्ध केल्या आहेत.

सुशोभीकरणाचे काम पूर्णत्वास गेल्यानंतर या पावसाळ्यात तलाव परिसरातील गवत पाच ते सहा ठिकाणी कुजत असल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी शिवसेनेचे सचिन शेट्ये यांनी पालिकेकडे तक्रारही केली.

पाण्याचा योग्य निचरा नाही
उद्यानात काही ठिकाणी गवतातून पाण्याचा योग्य निचरा होत नाही. त्यासाठी सध्याचे गवत काढून त्याची दुरुस्ती करावी लागणार आहे. पावसाळ्यात हे काम शक्य नसल्याने ते पावसाचा जोर कमी झाल्यानंतर या दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. या कामाबाबत संबंधित पोटठेकेदारास पालिकेने नोटीसदेखील दिली. त्यानुसार आवश्यक तेथे लॉनची दुरुस्ती करण्याची हमी ठेकेदाराने दिली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 AM 01/Aug/2025