राजापूर : युवापिढी मोबाईलच्या आहारी गेली असून, मोबाइलच्या अतिवापराचा मुलांवर दुष्परिणामही होताना दिसत आहे. ते टाळून मुलांचे शिक्षणाकडे लक्ष केंद्रित व्हावे आणि मोबाइलच्या दुष्परिणामांपासूनही ती दूर राहावी, या उद्देशाने वयाची १८ वर्ष होईपर्यंत आपल्या मुलाला पालकांनी वैयक्तिक मोबाईल घेऊन देऊ नये, असा निर्णय गोवळ गावात घेण्यात आला. सायंकाळी ६ ते ८ या कालावधीमध्ये टीव्ही बंद ठेवावेत यासह आणखी काही विधायक निर्णय घेण्यात आले आहेत.
मुलांनी शाळा, कॉलेजवरून घरी आल्यानंतर सायंकाळी अभ्यास करावा म्हणून घरामध्ये सायंकाळी ६ ते ८ या कालावधीमध्ये टीव्ही बंद ठेवावेत, असाही निर्णय घेण्यात आला. विविध शासकीय योजनांद्वारे गावविकास साधताना तालुक्यातील गोवळ ग्रामपंचायतीने सरपंच अभिजित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक ही बांधिलकी आणि संस्कारमूल्य जपणारेही उपक्रम राबवण्याचा निर्धार केला आहे.
ग्रामपंचायतीमधून कोणतेही दाखले घेताना ग्रामस्थांनी स्वखुशीने एक पुस्तक भेट म्हणून ग्रामपंचायतीला द्यावे वा आपल्या जागेमध्ये एक झाड लावून पर्यावरण संवर्धनाला सहकार्य करावे, असा ठराव गोवळ ग्रामपंचायतीमध्ये पारीत करण्यात आला आहे. या निर्णयाला सकारात्मक पाठिंबा देत ग्रामस्थांनी त्याची अंमलबजावणी करावी, असे आवाहन सरपंच कांबळे यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:15 AM 01/Aug/2025














