चिपळूण : दुतर्फा नाले नसल्याने डेरवण रुग्णालयादरम्यान रस्त्याची दुरवस्था

सावर्डे : झपाट्याने विकसित होत असलेल्या गोवा-मुंबई महामार्गावरील सावर्डे ग्रामपंचायत हद्दीतील डेरवणफाटा ते डेरवण रुग्णालयादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा नाले नसल्यामुळे रस्त्याची दुरवस्था होत आहे. अपघात टाळण्यासाठी रस्त्यावर गतिरोधक पाहिजे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.

मुसळधार पावसामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचते. त्याचा त्रास विद्यार्थी, रुग्णालयाकडे जाणारे कर्मचारी तसेच पादचाऱ्यांबरोबर वाहनचालकांनाही होत आहे. रस्त्याचीही हानी होत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर सावर्डेपासून दुर्गवाडीकडे जाणारा हा सार्वजनिक बांधकाम खात्याचा रस्ता खूपच वर्दळीचा बनलेला आहे. कै. गोविंदराव निकम सह्याद्री शिक्षणसंस्थेच्या शाळा, वालावलकर रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, डेरवण शिवसृष्टी यामुळे येथील रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूस नाले नसल्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही. परिणामी, ते पाणी रस्त्यावरून सखल भागाकडे वाहत जाते. त्या पाण्यावरून वाहने गेली की, बाजूला पाण्याचे फवारे उडतात. त्यात पादचारी चिखलयुक्त पाण्याने चिंब होतात. अशावेळी अंगावर पाणी उडल्यामुळे पादचारी व वाहनचालकांचे वादाचे प्रसंग उद्भवतात. कुडप फाटा, स्वप्नील निवास संकुल क्र. ३ व वरदायिनी हॉटेलसमोरील सखल भागात पावसाचे पाणी साचते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:29 PM 01/Aug/2025