रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा सहकार बोर्डाच्या संचालक मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक आज सहकार बोर्डाच्या कार्यालयात पार पडली. या बैठकीत हेमंत वणजु यांची अध्यक्षपदी, तर प्रताप सावंत यांची उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या मान्यतेने ही निवड प्रक्रिया पार पडली.
गेल्या निवडणुकीत डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार पॅनेलने जिल्हा सहकार बोर्डाच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला होता. त्यांच्या नेतृत्वाखालील टीमने जिल्हा पातळीवर सहकार क्षेत्रात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पूर्ण होताच नूतन अध्यक्ष हेमंत वणजु आणि उपाध्यक्ष प्रताप सावंत यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांसमवेत डॉ. तानाजीराव चोरगे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान डॉ. चोरगे यांनी संपूर्ण संचालक मंडळाला पुढील कार्यासाठी मार्गदर्शन केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
जिल्हा सहकार बोर्डाच्या या नवीन नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सहकार क्षेत्राला अधिक बळकटी मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. हेमंत वणजु आणि प्रताप सावंत यांच्या नेतृत्वाखाली बोर्ड सहकार क्षेत्रातील विविध आव्हानांना तोंड देण्यास आणि नवीन योजना राबवण्यासाठी सक्षम असेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.













