रत्नागिरी : तालुक्यातील मालगुंड येथील जीवन शिक्षण शाळा क्रमांक १, जी स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश राजवटीत १८५१ साली स्थापन झाली, ती शाळा यंदा १७५ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून ५ ऑगस्टपासून या शाळेच्या शतकोत्तर अमृत महोत्सवाला भव्य प्रारंभ होणार आहे. या शतकोत्तर अमृत महोत्सवाचा शुभारंभ २ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.
आदर्श जीवन शिक्षण शाळा नंबर १ मध्ये या समारंभाचे आयोजन येथील शाळा व्यवस्थापन समिती आणि शतकोत्तर अमृत महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. या शाळेच्या शतकोत्तर अमृत महोत्सवानिमित्त शैक्षणिक, सामाजिक आणि पर्यावरणविषयक उपक्रम तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त येथील शाळा व्यवस्थापन समिती आणि शतकोत्तर अमृत महोत्सव समितीच्या वतीने शाळा परिसरात मोठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. याकरिता दोन्ही समित्यांचे सर्व प्रमुख पदाधिकारी, सदस्य, पालक, आजी व माजी विद्यार्थी, ग्रामस्थ मेहनत घेत आहेत. माजी विद्यार्थ्यांचा सहभाग हा या महोत्सवाची खासियत आहे.
शाळेच्या जागेत बहुउपयोगी सभागृह उभारण्याचा संकल्प माजी विद्यार्थ्यांनी केला आहे. याशिवाय शासकीय पातळीवरून निधी मिळवण्यासाठी ही प्रयत्न सुरू आहेत. या महोत्सवाच्या कालावधीत वृक्षारोपण, निबंध, वक्तृत्व, चित्रकला, रांगोळी, संविधान पाठांतर, समूहगीत, देशभक्तीपर गीत गायन, क्रीडा स्पर्धा अशा अनेक स्पर्धा भरविण्यात येणार आहेत. यामध्ये शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, माजी विद्यार्थी व ग्रामस्थ उत्साहाने सहभागी होणार आहेत.
या महोत्सवाच्या शुभारंभाला आजी-माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, पालक, सरपंच व सदस्य, मुख्याध्यापकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आदर्श जीवन शिक्षण शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती व शतकोत्तर अमृत महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:19 PM 02/Aug/2025














