रत्नागिरी : व्यवसाय म्हटलं की कर्ज घ्यावे लागते. स्वतःचे भागभांडवल व्यवसाय सुरू केला, तरी कर्जाची व्यवसायवाढीसाठी आवश्यकता असते. बँका नेहमीच कर्ज देताना ग्राहकाची चारित्र्य, भांडवल व क्षमता पाहूनच कर्ज देते. आधीचे कर्ज कसे फेडले, कर्ज फेडण्यासाठी मानसिकता यांचा विचार केला जातो. १० लाखांपर्यंत मुद्रा कर्ज योजना आहे. १ कोटी ते ५ कोटी रुपयांपर्यंतच्याही कर्जयोजना आहेत. व्यवसायानुरूप त्याचा लाभ घेऊन महिला उद्योगिनींनी व्यवसाय वृद्धी करावी, असे प्रतिपादन बँक ऑफ इंडियाचे निवृत्त विभागीय व्यवस्थापक संतोष सावंत देसाई यांनी केले.
रत्नागिरी ग्राहक पेठतर्फे श्रावण महोत्सवानिमित आयोजित प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. माळनाका येथील जयेश मंगल पार्क येथे हे प्रदर्शन शुक्रवारपासून सुरू झाले. सावंत देसाई यांनी फीत कापून प्रदर्शनाचे उद्घाटन केले. याप्रसंगी उद्योजिका कोमल तावडे, उद्योजक गणेश धुरी, अॅड. राजशेखर मलुष्टे, ओंकार रहाटे, रत्नागिरी ग्राहक पेठच्या संचालिका संयोजिका प्राची शिंदे, माजी नगरसेविका शिल्पा सुर्वे, लायन्स क्लबचे अध्यक्ष संजय पटवर्धन, आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रदर्शनादरम्यान महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये २ ऑगस्टला दुपारी ३.३० फॅन्सी ड्रेस स्पर्धा, ३ ऑगस्टला दुपारी ३.३०- मी यशस्वी उद्योजिका मनोगत पूजा भूते, ४ ऑगस्टला दुपारी ३.३० वाजता लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे डॉ. शुभांगी बेडेकर महिलांना मार्गदर्शन करणार आहेत. प्रदर्शनाची वेळ ४ ऑगस्टपर्यंत सकाळी ११ ते रात्रौ ९ अशी आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:16 PM 02/Aug/2025














