रत्नागिरी : ‘उत्पादन शुल्क’मध्ये नवीन अधिकारी, जवान रुजू

रत्नागिरी : राज्य उत्पादन शुल्क विभागाला (एक्साईज) नवीन अधिकारी आणि जवान मिळाल्याने कारवाईला वेग येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा भरारी पथकाने संपूर्ण जिल्ह्यासह महामार्गावर दररोज गस्त सुरू केली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोवा बनावटीच्या विदेशी मद्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत. महिनाभरापूर्वी शहर युनिटचे निरीक्षक नंदकुमार कोकाटे निवृत्त झाले. त्याठिकाणी मुंबईहून नूतन निरीक्षक रवींद्र मोरे गुरुवारी रुजू झाले आहेत. त्याचबरोबर कारवाईसाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कमी असल्याने कारवाई करण्याच्या मोहिमेवर मर्यादा आल्या होत्या. परंतु, आता नवीन भरतीतील अनेक जवानसुद्धा रुजू झाले आहेत. त्यामुळे अधीक्षक कीर्ती शेडगे, उपअधीक्षक हर्षवर्धन शिंदे यांनी आपल्या दोन्ही उपविभागांतील अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना केल्या आहेत.

शासनाच्या नवीन निर्णयानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील उत्पादन शुल्कची पाच पैकी लांजा आणि रत्नागिरी ग्रामीण युनिट बंद होऊन दोन उपविभाग झाले. त्याचबरोबर शहर युनिटचे निरीक्षक कोकाटे निवृत्त झाले. त्यामुळे अधिकारी वर्गासह जवान संख्याही कमी होती. यामुळे या विभागामार्फत कारवाई करण्यात मर्यादा येत होत्या. आता मात्र नवीन जवान भरतीने ही अडचण संपुष्टात आली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेग येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 AM 18/Oct/2024