रत्नागिरी : झाडगाव येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रामध्ये ‘मत्स्यालय व्यवस्थापन’ या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षण सुरू आहे. यामध्ये शोभिवंत मत्स्यपालनातील व्यवसाय संधी यावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले जात आहे. याचा समारोप शुक्रवारी (ता. १८) होईल.
या कार्यक्रमाचे उद्घाटन बुधवारी (ता. १६) मत्स्य महाविद्यालय शिरगावचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. पी. ई. शिनगारे यांच्या उपस्थितीत झाले. या वेळी प्राध्यापक डॉ. केतन चौधरी, डॉ. असिफ पागारकर आणि सहयोगी संशोधन अधिकारी व प्राध्यापक उपस्थित होते.
शासकीय योजनांचा लाभ घेऊन यशस्वी उद्योजक बना, असे आवाहन डॉ. चौधरी यांनी केले तर डॉ. सावंत यांनी शोभिवंत मत्स्यपालन व्यवसाय हा स्वयंरोजगारकरिता उत्तम पर्याय असल्याचे सांगितले. वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. नाईक यांनी प्रशिक्षाणार्थीना मत्स्यव्यवसाय करताना सहकारवृत्तीचा अवलंबन करावा, असे आवाहन केले.
या प्रशिक्षणाला रत्नागिरी, पुणे, नाशिक, अहिल्यानगर, बार्शी, सोलापूर येथून विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमांतर्गत शोभिवंत मत्स्यपालन व्यवसायामधील संधी, शोभिवंत माशांची ओळख, पाणी व्यवस्थापन, मत्स्यालय टाकीची बांधणी, शोभिवंत मत्स्यप्रकल्पाचे शास्त्रीयदृष्ट्या बांधकाम, पिल्ले घालणारे मासे तसेच अंडी लावणारे मासे यांच्या विविध प्रजनन पद्धत, शोभिवंत पाणवनस्पतींची ओळख व अभिवृद्धीच्या पद्धती, आवश्यक विविध उपकरणे व साहित्य यांची ओळख, शोभिवंत माशांचे रोग व त्यावरील उपाय, कृत्रिम व जिवंत खाद्याचे प्रकार तयार करण्याच्या पद्धती, प्रकल्पाचे अर्थशास्त्र व प्रकल्प अहवाल तसेच शोभिवंत माशांची काढणी, वाहतूक व विक्री व्यवस्थापन तसेच शासनाच्या विविध अनुदान योजना या विषयावर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन देण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 18-10-2024








