रत्नागिरी : शहरातील मिरकर वाडा येथे फर्निचरचे काम सुरू असलेल्या एका दुकानात दोन कामगारांमध्ये झालेल्या वादानंतर एका कामगाराच्या छातीत धारदार हत्याराने वार करून त्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत हल्ला झालेला कामगार जागीच गतप्राण झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मिरकर वाड्यातील एका दुकानात फर्निचरचे काम सुरू होते. याच ठिकाणी काम करणाऱ्या दोन कामगारांमध्ये काही कारणावरून जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, एका कामगाराने दुसऱ्या कामगारावर धारदार हत्याराने हल्ला केला. छातीत वर्मी घाव बसल्याने जखमी कामगाराचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या घटनेनंतर फरार झालेल्या दोन संशयितांना पोलिसांनी रत्नागिरी रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
या घटनेमुळे मिरकर वाडा परिसरात तणावाचे वातावरण असून, स्थानिक नागरिक भयभीत झाले आहेत. पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असून, लवकरच या गुन्ह्याचा छडा लागेल अशी अपेक्षा आहे.













