रत्नागिरी जिल्हा लवकरच शैक्षणिक हब बनणार – उद्योगमंत्री उदय सामंत

मालगुंड : महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रात रत्नागिरी जिल्ह्याने मोठी प्रगती केली असून, भविष्यात हा जिल्हा शैक्षणिक हब बनेल, असा विश्वास राज्याचे उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे. मालगुंड येथील आदर्श जीवन शिक्षण शाळा क्रमांक एकच्या १७५ व्या वर्षाच्या (शतकोत्तर अमृतमहोत्सवी वर्ष) उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
डॉ. सामंत म्हणाले की, रत्नागिरी हा नररत्नांची खाण आहे. या जिल्ह्यात अनेक महान व्यक्तिमत्त्वे होऊन गेली. त्यांच्या आदर्शांचे अनुकरण करण्याची आज गरज आहे. आदर्श जीवन शिक्षण शाळेला १७५ वर्षे पूर्ण होणे, ही मालगुंडवासीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. या शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आश्वासनही त्यांनी दिले.
ते पुढे म्हणाले, “पूर्वीचे शिक्षण आणि आताचे शिक्षण यात मोठा फरक पडला आहे. बदलत्या काळानुसार शिक्षकांनी आणि पालकांनी आधुनिक शैक्षणिक साधनांचा स्वीकार करणे आवश्यक आहे. पालकांनी आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी पुढे आले पाहिजे.”
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते नामफलकाचे उद्घाटन, लोगोचे अनावरण आणि वृक्षारोपण करून झाली. त्यानंतर दीपप्रज्वलन करून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. डॉ. सामंत यांच्या हस्ते शाळेतील ज्येष्ठ माजी विद्यार्थ्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शतकोत्तर अमृतमहोत्सवी समितीचे सदस्य गजानन पाटील यांनी केले. त्यांनी शाळेचा इतिहास सांगत, शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली आणि शाळेच्या विकासासाठी पालकमंत्र्यांकडे विनंती केली. समितीचे सदस्य सुनील मयेकर यांनीही शाळेची वैशिष्ट्ये सांगत विकासासाठी लक्ष घालण्याची विनंती केली.