‘रनप’चा ठेकेदारी तत्त्वावरील २० टक्के कामगारांच्या कपातीचा निर्णय

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेतील मक्त्यावरील २० टक्के कामगार कपात करण्यावर प्रशासनाचे एकमत झाले आहे. रत्नागिरी नगर परिषदेची आर्थिक स्थिती फारच दोलायमान आहे. त्यामुळे पालकमंत्री उदय सामंत यांनी केलेल्या निर्देशानुसार तातडीने कपातीची कार्यवाही करण्यात आली आहे. रोजीरोटी जाणार या भीतीने सध्या काम करणाऱ्या तरुण तरुणींमध्ये नैराश्य निर्माण झाले आहे. त्याचवेळी कपातीनुसार कोणत्या कामगाराला कमी करायचे हा यक्षप्रश्न मक्तेदारांसमोर निर्माण झाला आहे.

पालकमंत्री उदय सामंत यांनी दोन महिन्यांपूर्वी मक्त्यांवरील कामगार कमी करण्याची सूचना केली होती. रत्नागिरी दौऱ्यावर असताना रस्त्यांवरची साफसफाई योग्य होत नसल्याचे दिसून आल्यानंतर पालकमंत्र्यांनी कामगार कपात करण्याची सूचना केली होती. आता नवीन कामगारांची निविदा प्रक्रिया होणार आहे. यामध्ये नगर परिषद प्रशासनाने २० टक्के कामगार कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पालकमंत्र्यांच्या निर्देशांबरोबरच नगर परिषदेची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन ही कार्यवाही करण्यात आली आहे.

रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रत्येक विभागात मक्त्यावरील कामगार आहेत. हे सर्व कामगार तरुण-तरुणी असून त्यांना पुढील निविदा प्रक्रियेत २० टक्के कामगार कपात होण्याचे कळल्यानंतर ते निराश झाले आहेत.

रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रशासनाने २० टक्के कपातीचा निर्णय घेतला असून त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे. कोणत्या विभागात कामगारांची निकड आहे हे निश्चित करून कपातीची संख्या ठरवली जाणार आहे. दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या तरुण-तरुणींपैकी कोणत्या कामगारांना कामावरून कमी करायचे हा प्रश्न मक्तेदारांसमोर निर्माण झाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:08 AM 04/Aug/2025