देवरुख : नावडी बाजारपेठ परिसरात शुक्रवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली. सरिता यल्लपा शास्त्री यांच्या पाळीव मांजरावर अचानक बिबट्याने हल्ला चढवला. मात्र, आपल्या मांजरीच्या रक्षणासाठी सरिता यांनी मोठे धाडस दाखवत बिबट्याला थेट पळवून लावले. या धाडसाबद्दल सरिता यांचे कौतुक होत आहे.
ही घटना रात्री उशिरा घडली. परिसरात रस्त्याच्या बाजूला अत्यंत कमी उजेड होता त्यात अंधारही दाटून आला होता. त्याच वेळी झाडीतून अचानक बिबट्या बाहेर पडला आणि मांजरीवर झडप घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रसंगावधान राखत सरिता शास्त्री यांनी आवाज करत बिबट्याला पिटाळले आणि आपल्या पाळीव मांजरीचे प्राण वाचवले.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून लवकरात लवकर या ठिकाणी योग्य प्रकाश व्यवस्था करण्याची जोरदार मागणी केली आहे. नावडी बाजारपेठेतील नागरिकांनी संबंधित वन विभाग आणि ग्रामपंचायतीकडे सुरक्षा उपाययोजनांची मागणी केली आहे.
मुंबई-गोवा महामार्गालगतच्या झाडीझुडपांची छाटणी आणि लाईट बसविणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. दरम्यान, सरिता यांनी आपल्या पाळीव मांजराचा जीव वाचवण्यासाठी जीव देखील त्यांनी धोक्यात घातला होता. मात्र त्यांच्या आवाजामुळेच बिबट्या पळाला अन्यथा अनर्थ घडला असता.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:16 AM 04/Aug/2025














