रत्नागिरी : महसूल मंत्रालयाने किनारपट्टीवर वसलेल्या मच्छीमारांच्या अनधिकृत झोपड्या नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा रत्नागिरी शहरातील राजीवडा किनारपट्टीवरील शेकडो झोपड्यांना लवकरच अभय मिळणार आहे. गेल्या ४० ते ४५ वर्षांत जिल्हा प्रशासनाने ही मच्छीमारांची वसाहत हटवण्याचा प्रयत्न केला.
परंतु माजी नगरसेवक तथा महाराष्ट्र मच्छीमार विकास संघाचे अध्यक्ष अब्दुल बिजली खान यांनी शासन, प्रशासन पातळीवर अर्ज, विनंत्या करून प्रसंगी आंदोलनाचा पवित्रा घेवून यशस्वी लढा दिला. आता जास्तीत जास्त झोपड्या नियमित व्हाव्यात यासाठी खा. नारायण राणे, मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्याशी पत्रव्यवहार करत असल्याचे मच्छीमार विकास संघाच्या अध्यक्षांनी सांगितले.
किनारपट्टीवरील सरकारी जागेतील अनधिकृत बांधकामांना अधिकृत परवानगी देण्याबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकताच निर्णय घेतला आहे. रत्नागिरीतील राजीवडा पुलाखालील श्रीदेव काशिविश्वेश्वर मार्ग पासून जेटी जवळच्या कस्टमच्या चौकीपर्यंत मच्छीमारांच्या अनधिकृत झोपड्या आहेत. या झोपड्यांवर गेल्या ४० वर्षात अनेक वेळा कारवाई करण्याचे प्रसंग आले. त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या नारायण राणे यांनी सहकार्य केले.
काही वेळेला आंदोलने आणि प्रशासन पातळीवर अर्ज, निवेदने करण्यात आली. कधीही कारवाई होईल या भीतीच्या छायेखाली असलेल्या मच्छीमारांना दिलासा मिळाला आहे. लोकसभेच्या निवडणुकीवेळी खा. नारायण राणे यांची राजीवड्यात जाहीर सभा झाली त्यावेळी या झोपडपट्टीचा मुद्दा खा. राणेंच्या पुन्हा लक्षात आणून दिला. त्यानंतर मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्याकडेही मच्छीमारांच्या झोपड्या वाचाव्यात यासाठी चर्चा केली. आता शासन निर्णयच झाला असल्याने राजीवड्यातील मच्छीमारांच्या अनधिकृत झोपड्या नियमित व्हाव्यात यासाठी खा. नारायण राणे आणि मंत्री नितेश राणे यांच्याकडे पत्रव्यवहार करत असल्याचे अब्दुल बिजली खान यांनी सांगितले. ५०० स्क्वे. फूटपर्यंतचे अनधिकृत बांधकाम नियमित करण्याचा निर्णय या मच्छीमारांना दिलासादायक ठरणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 AM 04/Aug/2025














