रत्नागिरी : रत्नागिरीत मतदारसंघात परिवर्तनासाठी सक्षम उमेदवार दिला पाहिजे, या मुद्द्यावर उद्धव ठाकरे गटाचे नेते राजेंद्र महाडिक आणि उदय बने यांच्याशी माजी आमदार बाळ माने यांची बंद दाराआड चर्चा झाली. विद्यमान मंत्री उदय सामंत यांच्यासमोर सक्षम पर्याय देण्याबाबत ठाकरे गटाकडून तयारी सुरू असल्याची चर्चा आहे.
भाजपचे माजी आमदार बाळ माने कोठेही जाणार नाहीत, असे वक्तव्य रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या भाजपच्या नेत्या आमदार चित्रा वाघ यांनी बुधवारी केले होते. त्यानंतर २४ तासांतच माने यांची ठाकरे सेनेतर्फे विधानसभेसाठी इच्छुक दोन प्रमुख शिलेदारांची भेट घेतल्याची माहिती पुढे आल्यामुळे तर्कवितकांना उधाण आले आहे. माने ठाकरे सेनेत जाणार, अशी आवई काही दिवसांपूर्वी उठवली होती. याला माने यांनी दुजोरा दिला नसला तरीही एका मेळाव्यात आपण चाललो आहोत, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे बाळ माने यांची ठाकरे गटाचे नेते राजेंद्र महाडिक आणि उदय बने यांच्याशी झालेली चर्चा ही ट्विस्ट असल्याचे बोलले जात आहे.
विधानसभा निवडणुकीत माने यांचा तीनवेळा पराभव झाला आहे. भाजप-शिवसेना युतीमुळे ठाकरे गटातील अनेकांशी मानेंचे जवळचे संबंध आहेत. त्यातूनच ते ठाकरे गटात प्रवेश करतील, असा अंदाज आहे; मात्र ठाकरे सेनेतून विरोध होत असल्यामुळे माने भाजपतच राहून वेगळा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या चर्चेबाबत अधिकृत माहिती देण्यास तिन्ही पदाधिकाऱ्यांनी नकार दिला. निवडणुकीत सर्वच गोष्टी उघड करायच्या नसतात, असे एका पदाधिकाऱ्याने सांगितले.
ठाकरेंकडे कार्यकर्त्यांची ताकद
युती तुटल्यानंतर २०१४ मध्ये उदय सामंत यांच्या रूपाने रत्नागिरीत शिवसेनेचा पहिला आमदार झाला. त्यानंतर पुन्हा युती होऊन २०१९ ला सामंत धनुष्यबाणाच्या निशाणीवर निवडून आले. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले आणि भाजप, शिंदे-अजित पवार एकत्र आले. राजकीय भूकंप झाला आणि शिवसेना फुटली. सध्या ठाकरे सेनेकडे सत्ता नाही, आमदारही नाहीत परंतु कार्यकर्त्यांच्या बळावर ते निवडणुकीला सामारे जाणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 18-10-2024














