पाली – कोकण विभागातील एक महत्त्वाचे बसस्थानक असलेल्या पाली बसस्थानकाचे नूतनीकरण अत्यंत दर्जेदार पद्धतीने करण्यात आले असून, ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान’ अंतर्गत झालेल्या पाहणीत या बसस्थानकाला ब वर्ग प्रकारात द्वितीय क्रमांक मिळाला आहे. हे स्थानक लवकरच आणखी अद्ययावत केले जाणार असून, तिथे सीसीटीव्ही कॅमेरे, ‘पे अँड पार्किंग’, सेल्फी पॉइंट आणि बगीचा उभारण्यात येणार आहे.
सर्वेक्षणातून पाली बसस्थानकाचा गौरव
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागाचे विभागीय वाहतूक अधीक्षक निलेश लाड आणि विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी अमित कळकुटकी यांनी पाली बसस्थानकाची पाहणी केली. बसस्थानकाचा परिसर, पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह आणि व्यावसायिक आस्थापनांची तपासणी करून प्रवाशांशी थेट संवाद साधून त्यांनी मूल्यांकन केले. या पाहणीत स्थानकाची स्वच्छता आणि उपलब्ध सुविधा उत्कृष्ट असल्याचे दिसून आले. या सर्वेक्षणासाठी स्थानिक प्रतिष्ठित नागरिक, सरपंच विठ्ठल सावंत, अॅड. सागर पाखरे, पोलीस पाटील अमेय वेल्हाळ आणि गुरुनाथ गराकटे यांनीही सहभाग घेऊन गुणात्मक अभिप्राय नोंदवले. यावेळी लांजा आगार व्यवस्थापक काव्या पेडणेकर आणि इतर अधिकारीही उपस्थित होते.
पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नांना यश
उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि पालीचे सुपुत्र उदय सामंत यांच्या पुढाकाराने आणि महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या निधीतून गेल्या वर्षीच या बसस्थानकाचे नूतनीकरण करण्यात आले. त्यामुळे प्रवाशांना सर्व सोयी-सुविधांनी युक्त असे सुसज्ज बसस्थानक उपलब्ध झाले आहे. हे स्थानक मुंबई-गोवा आणि मिऱ्या-नागपूर या दोन राष्ट्रीय महामार्गांवर असल्याने ते कोकण, कर्नाटक, पश्चिम महाराष्ट्र, गोवा आणि मुंबई विभागातील प्रवाशांसाठी एक मध्यवर्ती केंद्र बनले आहे.
नवीन सुविधांचा समावेश
प्रवाशांची कायम वर्दळ असल्यामुळे आणि सुरक्षेच्या दृष्टीने लवकरच बसस्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. याशिवाय, स्थानक परिसरातील सोयी-सुविधा वाढवण्यासाठी ‘पे अँड पार्किंग’ सुविधा सुरू केली जाईल. प्रवाशांसाठी आकर्षक सेल्फी पॉइंट आणि स्थानकाच्या आवारात एक सुंदर बगीचाही प्रस्तावित करण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान अधिक चांगल्या सुविधा मिळतील आणि बसस्थानकाचे सौंदर्यही वाढेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 04-08-2025














