रत्नागिरी : पावसाळ्यातील लाटांच्या तडाख्याने मिऱ्या किनाऱ्यावर अडकून पडलेले बसरा स्टार जहाजाचे दोन भाग झाले असून, इंजिनकडील भाग सुटून समुद्रात कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे, हे जहाज भंगारात काढण्यात आले असून, भंगार व्यावसायिकाच्या कामगारांनी दोनच दिवस काम करीत काही भंगार जहाजातून बाहेर काढले. परंतु लाटांमुळे त्यांनी पुढील काम थांबवले होते.
गेली पाच वर्ष बसरा स्टार हे जहाज मिऱ्या किनाऱ्यावर अडकून पडले आहे. वाळू व खडकात अडकून पडल्याने ते समुद्रात लोटण्यात अपयश आले. त्यातच किनाऱ्यावर लाटांचा माऱ्यामुळे या जहाजाचे मोठे नुकसान झाले आहे. नियमित लाटा आणि पावसाळ्यात रौद्ररुपात धडकणाऱ्या या लाटांमुळे या जहाजाच्या मधोमध पावसाच्या सुरुवातीलाच चीर गेली होती. मागील दोन-अडीच महिने जोरदार लाटांच्या प्रवाहामुळे जहाजाचे दोन तुकडे झाले होते. जहाजाचा इंजिनकडील भाग पुढील भागापासून वेगळा झाला असून, लाटांमुळे मागे सरकला आहे. हा इंजिनकडील भाग लाटांमुळे कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हे जहाज काही महिन्यापूर्वीच भंगारात काढले आहे. पावसाळ्याच्या दिवसातच जहाज तोडण्याचा प्रयत्न झाला. परंतु लाटांच्या माऱ्यामुळे काहीच भाग क्रेनच्या साह्याने जमिनीवर काढण्यात यश आले. दोन दिवस काम केल्यानंतर भंगार व्यावसायिकाने हे काम थांबवले आहे. सध्या जहाजाचे दोन्ही भाग दोरखंडाच्या सहाय्याने बांधून ठेवले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 AM 04/Aug/2025














