राजापूर : जिल्ह्यातील अवैध गोवा बनावटीच्या दारूविक्री विरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना बैठकीत दिले. मात्र, राजापूर तालुक्यात राजरोसपणे मोठ्याप्रमाणात अवैध गोवा बनावटीच्या दारू विक्री सुरू आहे. तालुक्यातील हॉटेल व बार व्यावसायिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तालुक्यातील ही विक्री पूर्ण थांबण्यासाठी हॉटेल व बार व्यावसायिकांनी लाक्षणिक उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
१३ ऑगस्टपर्यंत अवैध गोवा बनावटीच्या दारू विक्री विरोधात उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करीत तालुक्यातून समुळ उच्चाटन न केल्यास १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण छेडण्याचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
या निवेदनावर जयेंद्र कोठारकर, विनय गुरव, प्रशांत शिंदे, श्री. काणेकर, संदेश पाथरे, प्रशांत पवार, सचिन आखाडे, श्री. सक्रे आदींसह परवानाधारक वीस व्यावसायिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. तालुक्यात सुरू असलेल्या अवैध विक्रीमुळे व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होत असून शासनाचा महसूलही बुडत आहे. त्यामुळे या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 AM 04/Aug/2025














