राजापूर : साखरीनाटे बंदरात मासेमारीच्या नव्या हंगामाला प्रतिकूल हवामानाचा फटका

राजापूर : काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नारळी पौर्णिमेमुळे समुद्राला आलेले उधाण, अजस्त्र लाटा आणि सोसाट्याचा वारा यामुळे नव्या हंगामाच्या शुभमुहूर्ताला मच्छीमारांना फटका बसला. प्रतिकूल वातावरण बदलण्याची मच्छीमार बांधवांना प्रतीक्षा आहे. त्यामुळे साखरीनाटे बंदरामध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला.

तालुक्याच्या किनारपट्टीवर साखरीनाटे बंदर असून, दरदिवशी मच्छीमारीमधून लाखो रुपयांची उलाढाल होते. या ठिकाणी सुमारे पंचवीस पर्सनेट, दीडशे ते दोनशे फिशिंग ट्रॉलर, शंभर यांत्रिक होड्या, सुमारे पन्नास बिगर यांत्रिक होड्या असे मिळून तीनशेहून अधिक मच्छीमार नौका मच्छीमारी करतात. मच्छीमारी बंदीचा काळ ३१ जुलैला संपला असून, नव्या हंगामाला सुरुवात झाली आहे. मात्र, नव्या हंगामाला प्रतिकूल हवामानाचा फटका मच्छीमारांना बसला आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांमध्ये केवळ आठ ते दहा लाखांची उलाढाल झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

रात्रीपेक्षा दिवसाच्या मासेमारीवर भर
नव्या मच्छीमारी हंगामाच्या सुरुवातीला मुबलक प्रमाणात विविध प्रकारचे बंपर मासे मिळतात. या काळामध्ये माशांचा दरही चांगला असतो. त्यामुळे नव्या हंगामाचा मुहूर्त साधण्यावर मच्छीमार बांधवांचा भर असतो. या काळामध्ये पाण्याच्या प्रवाहाचा असणारा वेग, जाळी टाकण्यात येणाऱ्या मर्यादा आदी कारणांमुळे रात्रीच्या मासेमारीपेक्षा दिवसाच्या प्रकाशामध्ये मासेमारी करण्यावर त्यांचा अधिकच भर दिसतो.

समुद्राला आलेले उधाण आणि त्याच्या जोडीने सोसाट्याचा वाराही वाहत आहे. पाण्याला काही प्रमाणात करंट अशा प्रतिकूल स्थितीमध्ये समुद्रामध्ये मच्छीमारी करणे मुश्किल आहे. त्यामुळे नव्या हंगामाच्या सुरुवातीलाच प्रतिकूल हवामानामध्ये मच्छीमारी करण्याचे मच्छीमारांनी टाळले. येत्या काही दिवसांमध्ये वातावरण अनुकूल होईल. त्यानंतर मच्छीमारीला सुरुवात होईल- अमजद बोरकर, मच्छीमार नेते

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:21 AM 04/Aug/2025