Maharashtra Weather Update: राज्यात पावसाची विश्रांती

मुंबई : Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर ओसरलेला असून, बहुतांश भागांत केवळ हलक्या सरींची नोंद होत आहे. हवामान विभागानुसार, सध्या राज्यात मुसळधार पावसाची शक्यता कमी असली तरी विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील ३ ते ४ दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता असून, हवामान विभागाने या भागांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.दरम्यान, राज्यातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, हिंगोली, लातूर, धाराशिव, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये हलक्या सरींची शक्यता आहे. पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी परिसरातही ढगाळ हवामानासह मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो.नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्येही हलक्यापासून मध्यम पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव आणि हिंगोली भागांत विजांसह पावसाचा इशारा आहे.सध्या पावसाचा जोर कमी असल्यामुळे राज्यातील काही भागांमध्ये तापमानात वाढ झाली आहे. नागपूरमध्ये शनिवारी कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. हवामान विभागाच्या माहितीनुसार, ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर अधिक राहू शकतो. त्यामुळे नागरिकांनी व शेतकऱ्यांनी हवामानाच्या अपडेट्सकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:33 04-08-2025