ऐन पावसाळ्यात जांभारी गावामध्ये धावतोय टँकर

रत्नागिरी : ऐन पावसाळ्यात रत्नागिरी तालुक्यातील जांभारी गावामध्ये गेले सहा दिवस कळझोंडी धरणातून पाणी पुरवठाच होत नसल्यामुळे तेथील ग्रामस्थांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. खाडीकिनारी बसलेल्या जांभारी गावातील साडेतीन हजाराच्या लोकवस्तीला पिण्याच्या पाण्यासाठी कळझोंडी धरणावरच अवलंबून राहावे लागत आहे. याबाबत जांभारी ग्रामपंचायतीमार्फत लोकप्रतिनिधीसह प्रशासनाकडेही दाद मागितली. परंतु त्यांच्या पदरी निराशाच आली आहे.

श्रावणात विविध धार्मिक उत्सव गावात साजरे होत असतात. नामसप्ताहासाठी परगावातून पाहूणे दाखल झालेले आहेत, त्यामुळे पाण्याची गरज वाढलेली आहे. या परिस्थिती पाणीच मिळत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या प्रश्नाकडे पालकमंत्री उदय सामंत यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

जयगड दशक्रोशीतील २८ गावांना कळझोंडी धरणातून पाणी पुरवठा केला जातो. मागील वर्षी या धरणाची उंची वाढविण्यात आलेली आहे. या पावसात धरण पूर्ण भरलेले आहे. मात्र धरणातून पाणीपुरवठा होत असलेल्या पाईपलाईन ३० वर्षापूर्वीच्याच आहेत. पाण्याच्या दाबाने त्या कधी फुटतात, तर कधी एअर पकडल्यामुळे पाणीच पुढे जात नाही. त्याचाच फटका जांभारी गावाला बसला आहे. खाडीकिनारी हे गाव वसलेले असल्याने तेथील सर्व विहिरीचे पाणी मचूळ आहे. ते पिण्यायोग्य नसल्याने कळझोडी धरणातून मिळणाऱ्या पाण्यावरच ग्रामस्थ अवलंबून आहेत.

मागील सोमवारी पाईप फुटल्यामुळे पाणी आले नाही. तेथील दुरुस्ती पूर्ण झाली. पण मागील पाच दिवस गावात पाणीच आले नाही. गावातील पाणीपुरवठा करणाऱ्या टाक्यांमध्ये खडखडाट आहे. सरपंच आदेश पावरी यांनी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यांनी पाणी सुरू असल्याचे सांगितले.

ग्रामस्थांना आर्थिक भुर्दंड जांभारी गावाची लोकवस्ती साडेतीन हजार इतकी आहे. पाणी नसल्याने ग्रामस्थांना ६०० रुपये मोजून १००० लिटर पाण्याचा टँकर मागवावा लागत आहे. दिवसाला २० हून अधिक टँकर गावात येत आहेत. दिवसाला १२ हजाराचे पाणी विकत घ्यावे लागत असल्याने ग्रामस्थांना आर्थिक भुर्दंड बसला आहे.

सतत पाठपुरावा करुनही पाण्याची समस्या सुटत नाही. सध्या गावात नामसप्ताह सुरू असल्याने पाणी अधिक लागते. पाच काळात गेले सहा दिवस पाणी पुरवठाच झालेला नाही. जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने वेळीच त्यामध्ये लक्ष द्यावे आणि पाणीपुरवठा सुरळीत करावा. – आदेश पावरी, सरपंच

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:11 PM 04/Aug/2025