दापोली : स्मार्टमीटर सक्तीविरोधात ‘महाविकास आघाडी’ आक्रमक

दापोली : तालुक्यात घरगुती ग्राहकांना जबरदस्तीने प्री-पेड वीजमीटर बसवले जात असल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (ता. १) महावितरणच्या दापोली कार्यालयात धडक दिली. मीटर बसवणाऱ्या कंपन्यांकडून जबरदस्ती, धमकी आणि काही बंद घरांमधून विनापरवाना मीटर बसवले जात असल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

ठाकरे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांचे दापोलीतील तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर, मंगेश मोरे आणि सचिन तोडणकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात प्री-पेड मीटर सक्ती नसल्याचे स्पष्ट सांगितले असूनही दापोलीत मीटर बसवले जात आहेत.

महावितरणच्या उपविभाग १चे उपकार्यकारी अभियंता अरविंद कुकडे आणि उपविभाग २चे उपकार्यकारी अभियंता नीलेश बेंडाळे यांना आंदोलनकर्त्यांनी लेखी निवेदन सादर केले. प्री-पेड मीटर सक्ती रद्द करावी, कंपन्यांकडून होणाऱ्या गैरप्रकारांवर कारवाई करावी अन्यथा निर्माण होणाऱ्या असंतोषासाठी महावितरण जबाबदार राहील, असे निवेदनात म्हटले आहे. शिवसेना तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन तोडणकर यांनी भूमिगत वीजवाहिन्यांमुळे ग्रामपंचायत हद्दीतील रस्ते खराब होत असल्याचे मुद्दे मांडले. रस्त्यांची दुरुस्ती कोण करणार यावर अधिकाऱ्यांकडे ठोस उत्तर नसल्याने ते अडचणीत सापडले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:40 PM 04/Aug/2025