रत्नागिरी : मागील आठवड्यापासून पावसाने रत्नागिरी जिल्ह्यात दमदार बॅटिंग केली होती. धो- धो पावसामुळे नद्यांनी इशारा पातळी गाठली होती. मात्र, आता दोन दिवसांपासून कोकणात पावसाने विश्रांती घेतलेली आहे. काही ठिकाणी तुरळक रिमझिम पाऊस पडतो. रविवारी केवळ 8 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. दोन महिन्यांनंतर रत्नागिरी शहरासह इतर तालुक्यांत सूर्यनारायणाचे दिवसभर दर्शन झाले आहे. दरम्यान, जिल्ह्यात 1 जून ते 3 ऑगस्टपर्यंत 65.95 टक्के इतका पाऊस झाला आहे तर गतवर्षी याच कालावधीत 95.59 टक्के इतका पाऊस झाला होता. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाची टक्केवारी, सरासरी पाऊस कमी झाला आहे.
कोकणात यंदा मान्सूनपूर्व पावसाने आठ दिवसांपूर्वीच हजेरी लावली. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने दमदार सुरुवात केली. अक्षरश: पावसाने हाहाकार माजवला होता. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यानंतर जून महिन्यात मान्सूनच्या पावसाने सुरुवात केली. कधी मुसळधार तर कधी संततधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकर्यांनी भात, नाचणी पेरणीची कामे केली. भात, नाचणीची लावणी केली. दुसरीकडे मुसळधार पावसामुळे कित्येक रस्ते खचले, दरडी कोसळल्या, वीज पडून काही व्यक्तींचा मृत्यू झाला होता. तसेच 3 कोटींहून अधिक सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले. तसेच घरांची पडझड ही झाली आहे. काहींना नुकसान भरपाई देण्यास सुरुवात झाली आहे. पावसामुळे शेतकर्यांच्या पिकांचे ही नुकसान झाले आहे. जिल्ह्यात अशी परिस्थिती पावसाने निर्माण केली होती.
जून, जुलै महिन्यात पावसाने दमदार बॅटिंग केली. मात्र ऑगस्ट महिन्यात त्याने विश्रांती घेतलेली आहे. सर्वाधिक पाऊस राजापूर, खेड, चिपळूण आणि लांजात झाल्याचे आकडेवारीवरून समजते. काही प्रमाणात रिमझिम पाऊस पडत आहे. दोन महिन्यानंतर आता सूर्यनारायणाने दर्शन दिले आहे. अशी परिस्थिती असली तरी जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा पर्जन्यमान कमी झालेला आहे. 700 मि.मी. पाऊस कमीच झाला आहे.
शहरातील रस्त्यावर खडी टाकून मलमपट्टी
पावसामुळे शहरातील रस्त्यांची अक्षरश: वाट लागली आहे. त्यामुळे रस्ते दुरुस्ती करण्यासाठी आता नगरपरिषदेने सुरुवात केली आहे. ऑगस्टअखेर लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे. त्यामुळे रस्त्यावर पडणार्या खड्ड्यांवर तात्पुरती कचखडी टाकून मलमपट्टी करण्यात येत आहे.
पाऊस राजापूर, खेड, चिपळूण अन् लांजात
जिल्ह्यात पावसाने दमदार बॅटिंग केली होती. यामध्ये सर्वाधिक पाऊस हा खेड, राजापूर, चिपळूण आणि लांजा तालुक्यात झाला आहे, येथे पावसाची टक्केवारी सर्वाधिक आहे तर सर्वात कमी मंडणगड, दापोली आणि रत्नागिरी शहरात झाला आहे.
भात, नाचणी लागवड अंतिम टप्प्यात
रत्नागिरी जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे खरीप हंगामातील भात व नाचणी लावणीस वेग आला होता. आतापर्यंत जिल्ह्यात 95 टक्क्यांहून अधिक भात, नाचणी लावणीची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित लावणी कामे ही लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:07 04-08-2025














