रत्नागिरी : पीक विमा योजनेस १४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

रत्नागिरी : जिल्ह्यात विविध नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील ८३ महसूल मंडळातील शेतकऱ्यांना भात व नाचणी या पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत होती. अर्ज करताना तांत्रिक अडचण लक्षात घेता तसेच अद्यापही कित्येक शेतकऱ्यांनी अर्ज न केल्यामुळे पीकविमा नोंदणीस १४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना दिली. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत दीड हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे.

एका रुपयात सरंक्षण या घोषवाक्याने प्रसिध्द झालेली प्रधानमंत्री पीक विमा योजना यंदा नव्या स्वरूपात जिल्ह्यात लागू करण्यात आली. गुरुवारअखेर दुपारपर्यंत १ हजार २१४ शेतकऱ्यांनी २८.१६. हेक्टर क्षेत्रावरील पीक विम्यासाठी पीक विमा भरला आहे. दरम्यान, पीकविमा अर्ज नोंदणीसाठी अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात १४ ऑगस्टपर्यंत योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक नोंदणी ही खेड, दापोली, चिपळूण, मंडणगडात झाली असून सर्वात कमी नोंदणी ही लांजा आणि गुहागर तालुक्यात झाली आहे.

मागील वर्षी कर्जदार, बिगर कर्जदार शेतकरी मिळून १४ हजार ३२४ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. मागील वर्षाच्या तुलनेत यंदाची आकडेवारी फारच कमी आहे. अर्ज करताना शेतकऱ्यांना आलेली तांत्रिक अडचण लक्षात घेवून, शासनाने बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होणारी १४ ऑगस्ट तर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ३० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. शेतकऱ्यांनी याचा घ्यावा, असेही आवाहन कृषी अधिकारी सदाफुले यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:08 PM 04/Aug/2025