रत्नागिरी : जिल्हा परिषद शिक्षण विभागातील ‘तो’ शिक्षण विस्तारअधिकारी पुन्हा एकदा वादात सापडला आहे. प्रेमाच्या गोष्टी बोलण्यास नकार दिल्याने कायम बदल्या करून मानसिक त्रास देत असल्याची रितसर तक्रार शहरातील एका शिक्षिकेने प्रशासनाकडे केली आहे. यामुळे रत्नागिरी शाळांमधील महिला शिक्षिका सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे.
रत्नागिरी तालुक्यात गेल्या महिन्यात एका शाळेतील मुख्याध्यापिकेला या विस्तार अधिकाऱ्याच्या गैरवर्तनाला सामोरे जावे लागले होते. याबाबत या शिक्षिकेने शिक्षण विस्तार अधिकाऱ्याच्या विरोधात जिल्हा प्रशासनाकडे लेखी तक्रार केली होती. या महिला शिक्षिकेने तो शिक्षण विस्तार अधिकारी अपमानकारक व मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करत असल्याचे तक्रारीत म्हटले होते.
आता पुन्हा दुसऱ्या एका शिक्षिकेने त्याच विस्तार अधिकाऱ्याच्या विरोधात गैरवर्तणूक केल्याचा आरोप करत प्रशासनाकडे धाव घेतली आहे.
नगर परिषदेच्या शाळांचा पदभार त्याच्याकडे आहे. यामुळे शहरातील शाळांमध्ये त्याचा संबंध येतो. शहरातील एका शाळेतील शिक्षिकेने या शिक्षण विस्तार अधिकाऱ्याच्या विरोधात प्रशासनाकडे लेखी तक्रार केली आहे. ऑफिसमध्ये मला अनेकवेळा एकटीलाच बोलावून प्रेमाच्या गोष्टी करत असताना त्याला प्रतिसाद न दिल्याने याचा मनात राग धरून मला ते मानसिक त्रास देत आहेत. आतापर्यंत त्यांनी १५ वेळा माझी बदली केली आहे. असे या महिलेने तक्रार अर्जात नमूद केले आहे. महिला शिक्षिकांबाबत दोनवेळा या शिक्षण विस्तार अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार दाखल झाली आहे. यामुळे प्रशासन आता कोणती भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.
२२ दिवसांनंतरही कारवाई नाही
हा शिक्षण विस्तार अधिकारी नेहमीच या ना त्या कारणाने वादात असतो. त्याच्याविरोधात २४ सप्टेंबरला पहिली तक्रार झाली. आता या गोष्टीला २२ दिवस झाले. मात्र, संबंधित महिला मुख्याध्यापिकेला अजूनही न्याय मिळालेला नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 AM 18/Oct/2024














