खेड : तुंबाड-अंजनी नदीवर पूल व्हावा

खेड : तालुक्यातील तुंबाड ते अंजनी नदीवर पूल नसल्याने येथील पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या दळणवळणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पर्यायाने येथील तरुण रोजगारासाठी मुंबई-पुणेसारख्या शहरात स्थलांतरित होत आहे. आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यास मोठ्या प्रसंगाना सामोरे जावे लागत आहे. तरी तुंबाड-अंजनी नदीवर पूल व्हावा, अशी मागणी मनसेचे खेडचे माजी तालुकाध्यक्ष संदीप फडकले यांनी केली आहे.

याबाबत माहिती देताना ते म्हणाले की, तुंबाड-अंजनी नदीवर पूल झाल्यास येथील ग्रामस्थांच्या दळणवळणाचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. तसेच बेरोजगार तरुणांना लोटे औद्योगिक वसाहतीत नोकरीस जाणे सोपे होईल. या नदीवर पूल नसल्याने अनेक तरुण मुंबई-पुणे सारख्या शहरांमध्ये स्थलांतर होत आहेत. हा पूल झाल्यास आपल्या गावी येतील आणि पुन्हा लोटे औद्योगिक वसाहतीत नोकरीस जातील, असे संदीप फडकले यांनी यावेळी सांगितले.

या पुलाचा खाडीपट्टा परिसरातील गावे तुंबाड, सवणस, बहिरवली नं. १, बहिरवली चौगुले मोहल्ला, होडखाड, पन्हाळजे, सवणस खुर्द, सवणस, मुळगाव, आमशेत, कर्जी, राजवेल, शिर्शी, मुंबके, अनसपुरे, तळघर (ता. खेड) भडवळे, फरारे, उन्हवरे, तामोंड दमामे, कात्रण, पोफळवणे (ता. दापोली) आदी गावातील ग्रामस्थांना उपयोगाचा ठरणार आहे, अशी माहिती यावेळी दिली. फडकले यांनी अंजनी रेल्वे स्थानकांत दिवा पॅसेंजरला थांबा मिळाल्याने अंजनी स्थानकांत प्रवासी संख्येत वाढ होईल. याचबरोबर दळणवळण व पर्यटनाला चालना मिळण्याच्या दृष्टीने तुंबाड शिवलीवाडी ते अंजनी रेल्वे स्टेशनला जोडणारा जगबुडी नदीवर पक्का पूल होणे काळाची गरज आहे. हा देखील पूल झाल्यास दापोली, खेड, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी या महत्त्वाच्या जिल्ह्यांना जोडणारा जोड रस्ता तयार होईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काचेचा पूल तयार होऊ शकतो. तर या नदीवर पूल का नाही व्होवू शकत नाही? असा प्रश्न मनसेचे खेडचे माजी तालुकाध्यक्ष संदीप फडकले यांनी उपस्थित केला आहे. शासनाने या विषयाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी संदीप फडकले यांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:32 PM 04/Aug/2025