रत्नागिरी : जिल्ह्यात एलपीजी गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरच्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सोमवारी (४ ऑगस्ट २०२५) सकाळी मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा गावात भरधाव वेगात येणाऱ्या एका एलपीजी गॅस टँकरने रस्त्याकडेच्या टपऱ्यांना उडवले. त्याच दिवशी निवळी-गणपतीपुळे रस्त्यावरही एक एलपीजी टँकर उलटून अपघात झाला. सुदैवाने दोन्ही टँकरमधून कोणतीही वायुगळती झाली नाही. मात्र, चारच दिवसांपूर्वी झालेल्या अपघातानंतर पुन्हा दोन टँकरचा अपघात झाल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हातखंबा येथे टँकरने टपऱ्या उडवल्या
सोमवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरून गोव्याकडे एलपीजी गॅस घेऊन जाणाऱ्या एका टँकरवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे हा टँकर भरधाव वेगात रस्त्याच्या कडेला असलेल्या टपऱ्या व दुचाकींवर जाऊन आदळला. या अपघातामुळे हातखंबा येथील ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. वारंवार होणाऱ्या या अपघातांमुळे आमच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
निवळी-गणपतीपुळे रस्त्यावर टँकर उलटला
हातखंबा येथील अपघातासोबतच सोमवारी निवळी-गणपतीपुळे रस्त्यावरही एलपीजी गॅस टँकरला अपघात झाला. हा टँकर रस्त्याच्या कडेला उलटला, परंतु सुदैवाने यातून कोणत्याही प्रकारची वायुगळती झाली नाही. यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होणाऱ्या अशा घटनांमुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
सततच्या अपघातांमुळे ग्रामस्थ ‘गॅसवर’
जून महिन्यात याच भागात गॅस टँकरच्या अपघातानंतर वायुगळती होऊन आग लागली होती. त्यावेळी तब्बल १७ तास महामार्ग बंद होता. त्यानंतर मागील आठवड्यात मंगळवारी झालेल्या अपघातातही वायुगळती झाल्याने १४ तास वाहतूक ठप्प होती. अशा गंभीर घटना वारंवार घडत असल्याने ग्रामस्थ प्रचंड चिंतेत असून, प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.














