एसटीचे समूह आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना ३० टक्के भाडेवाढ

चिपळूण : राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या बसगाड्यांचे समूह आरक्षण करणाऱ्या प्रवाशांवर ३० टक्के भाडेवाढ लादण्यात आली आहे. परतीच्या प्रवासासाठी २४ तासानंतरचे गट आरक्षण केल्यास त्यांनाही वाढीव दर भरावा लागणार आहे. त्यामुळे एसटीचा प्रवासी खासगी वाहतुकीकडे वळताना दिसत आहे.

चिपळूणमधून परतीच्या मार्गासाठी सध्या एसटीऐवजी खासगी प्रवासी वाहतुकीच्या गाड्यांना चाकरमान्यांनी प्राधान्य दिले आहे. चिपळूणमधून परतीच्या प्रवासासाठी ६८९ चाकरमान्यांनी खासगी वाहतूकदारांकडे आगाऊ तिकीट आरक्षित केले आहे. चिपळूणमध्ये चार ठिकाणी खासगी वाहतूक करणाऱ्या एजन्सीचे स्टॉल लागले आहेत. तेथे परतीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची बुकिंग सुरू आहे. राजकीय पक्षांना साध्या दरात शेकडो बसगाड्या उपलब्ध करून देत असताना, सर्वसामान्य गणेशभक्तांच्या माथी भाडेवाढ लादल्याने संताप व्यक्त होत आहे.

एसटी महामंडळाकडून नफ्या-तोट्याचा विचार न करता केवळ गणेशभक्तांच्या सोईसाठी उत्सवानिमित्त पाच हजार जादा बसगाड्या चालवणार आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली होती. यातील साडेतीनशे एसटीच्या फेऱ्या चिपळूण परिसरात येणार आहेत. मात्र समूह आरक्षण सुरू होताच महामंडळाने तोटा होत असल्याचे कारण देत भाडेवाढ लागू केली आहे.

एसटी बसमधून प्रवाशांचा एक गट किमान ४० प्रवासी एका ठिकाणाहून थेट अन्य ठिकाणी प्रवास करणार असेल तर गट पद्धतीने आरक्षण लागू करण्यात येते. या गाड्या परतीच्या प्रवासात रिकाम्या धावतात. यामुळे गट आरक्षणासाठी ३० टक्के भाडेवाढ केली आहे-दीपक चव्हाण, आगारप्रमुख, चिपळूण

चिपळूण ते मुंबई एसटी तिकीट साडेचारशे रुपये आहे. नव्या दानुसार १३५ रुपये जादा द्यावे लागणार आहेत. एसटीमध्ये चांगल्या सुविधा नसतात. त्यामुळे प्रवास करताना हाल होतात. त्यामुळे थोडे आणखी पैसे टाकले तर खासगी वाहतुकीतून आरामदायी प्रवास करता येतो. – संतोष निमकर, प्रवासी, चिपळूण

१५ टक्के सूट देण्याचा निर्णय बासनात
एसटी गाड्यांचे आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना १५ टक्के सूट देण्याचा निर्णय ३० जूनला घेण्यात आला होता, मात्र त्यानंतर १५ जुलैला पाच हजार गणेशोत्सव विशेष गाड्यांसाठी आरक्षण करताना ही सवलत लागू नसल्याचे जाहीर करण्यात आले. अशातच आता थेट ३० टक्के भाडेवाढ लागू करण्यात आली. प्रवाशांना सवलत द्यायची नसेल तर किमान भाडेवाढ तरी करू नये.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:08 PM 04/Aug/2025