दापोली : हर्णेत मच्छीमारांच्या जाळ्यात पापलेट, कोळंबी

दापोली : हवामान अस्थिर असल्यामुळे हर्णे बंदरातील मोजक्याच नौकांनी मुहूर्त साधला आहे. काही नौका मासेमारी करून माघारी परतल्या असून, त्यांच्या जाळ्यात पापलेट, कोळंबी लागली आहे. सध्या श्रावण सुरू असल्याने मासळीला मागणी कमी आहे. मच्छीमारांना दरही अपेक्षित मिळालेला नसल्याने मुहूर्ताच्या मासळीने निराशाच झाली आहे.

हर्णे बंदरातील मच्छीमारी नौका दोन महिन्यांनंतर समुद्रात रवाना झाल्या. काही नौकांना मासळी मिळाल्याने त्या किनाऱ्यावर दाखल झाल्या आहेत. त्यामुळे बंदरात लिलावाचा मुहूर्त झाला. हंगामाच्या सुरुवातीलाच पापलेट, बोंबील यासारखी महागडी मासळी जाळ्यात लागली होती. मात्र, श्रावण महिना असल्यामुळे बाजारपेठेत मासळीची मागणी कमी आहे. तसेच शनिवार, रविवार सुटीचे दिवस असूनही पर्यटकांचा राबता कमी आहे. त्यामुळे स्थानिक बाजारात तेवढी उलाढाल नाही. परिणामी, किनाऱ्यावर सरसकट पापलेट ७०० ते ७५० रुपये प्रतिकिलो दराने विक्री केला जात आहे. बोंबीलच्या दरातही चढ-उतार आहे. सध्या टायनी, पोलण कोळंबी मर्यादित मिळाली आहे. तरी त्यालाही अपेक्षित दर मिळालेला नाही. लिलावात अनिश्चितता असल्याने मासेमारी करून आलेल्या अनेक नौकांनासमाधानकारक दर मिळालेला नाही. इंधन दरात वाढ झाल्यामुळे मासेमारीचा खर्च अधिक आहे. डिझेल, बर्फ, जाळी, मजुरी आदींचा खर्च भरून काढण्यासाठी एक महिना जावा लागेल, तेव्हा कुठे काहीतरी हाती लागेल, अशा प्रतिक्रिया हर्णेतील मच्छीमार व्यक्त करीत आहेत.

सुरुवातीलाच पापलेट आणि बोंबीलसारखी मासळी मिळतेय; परंतु त्याला दरच नाही. पापलेट मिळण्याची शाश्वती नाही. खर्च भरूनही निघणे कठीण आहे. डिझेलचे दरही वाढले आहेत. गेल्यावर्षीची हानी अजून सावरलेली नाही- नंदकुमार चोगले, मच्छीमार

सर्व नौका समुद्रात गेलेल्या नाहीत
बंदरातील सर्व मच्छीमार अजून मासेमारीसाठी समुद्रात गेलेले नाहीत. हवामानाची स्थिती, मासळीचा साठा आणि दर पाहूनच नौकांना मासेमारीसाठी पाठवले जात आहे. गणपतीनंतरच हंगाम अधिक जोमात सुरू होईल. हर्णे बंदरातील मासेमारी व्यवसाय सध्या प्रामुख्याने भागीदारी पद्धतीने सुरू आहे. गणपतीनंतर मात्र हेच खलाशी पगारावर काम करतात आणि मासेमारी हंगामाला अधिक वेग येतो.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:17 PM 04/Aug/2025