संगमेश्वर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा फटका तालुक्यातील आरवली येथील गरम पाण्याच्या कुंडाला बसला आहे. या परिसरातील ५० ते ६० मीटर रस्त्याचे काँक्रिटीकरण झालेले नसल्याने पावसात नागरिकांना चिखलातून पायपीट करावी लागत आहे. यासह येथील विविध समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून फक्त आश्वासने दिली जातात. याकडे गांभीर्याने पाहावे, असा इशारा बहुजन विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष, बळीराज सेनेचे उपाध्यक्ष सुरेश भायजे यांनी दिला आहे.
महामार्गावर चिपळूणकडे जाताना आरवली येथे डाव्या बाजूला पावसाळ्यापूर्वी रस्ता खोदण्यात आला होता. त्या रस्त्याचे काँक्रिटीकरण झालेले नाही. मुंबईकडे जाणारी वाहने पुलावरूनच जातात मात्र, आरवली पंचक्रोशीतील प्रवाशांना पावसाळ्यात चिखल तुडवत महामार्ग गाठावा लागत आहे. याबाबत वारंवार मागणी करूनही ५० ते ६० मीटर रस्त्याचे डांबरीकरण वा काँक्रिटीकरण केले गेलेले नाही. मुंबईकडे जाताना पुलाच्या उजव्या बाजूचा रस्ता जसा काँक्रिटचा केला गेला आहे. त्यावरून आरवली ते संगमेश्वर आणि रत्नागिरीकडे जाणाऱ्या गाड्यांची रहदारी सुरू आहे. तसाच डाव्या बाजूचा रस्ताही कॉक्रिटचा केला जावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
आरवली येथील गरम पाण्याचे कुंड हे ‘क’ पर्यटन क्षेत्रात आहे. मात्र चुकीच्या बांधकामामुळे पहिल्याच पावसात चिखलयुक्त माती पाण्याबरोबर कुंडात गेले होते. त्यामुळे कुंडातील जैवविविधतेला फटका बसण्याची भीती आहे. या महामार्गावर पूर्वी ब्रिटिशकालीन कमानी पध्दतीची मोरी बांधण्यात आली होती. दगडामध्ये पाट कोरून त्यातून उन्हाळ्यात बारमाही पाणी नदीत सोडले जात होते. तसेच किनारी भागात कट्ट्यावर दगडाची फरशी बांधून त्यावरून गावातील व परिसरातील ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी मार्ग होता. त्यामुळे महापुराचे पाणी जरी कुंडात शिरले तरी पाणी ओसरल्यानंतर कुंड व परिसर स्वच्छ राहात होता. प्रतिकूल आणि अत्याधुनिक साधनसामग्रीचा अभाव असतानाही ब्रिटिश काळात या कुंडाची काळजी घेतली गेली. पण, आज त्या कुंडाची अवस्था बिकट झाली आहे. ठेकेदाराचा निष्काळजीपणा याला कारणीभूत असून, डोळेझाक करणारे अधिकारी तितकेच जबाबदार आहेत, असे भायजे यांचे मत आहे. आरवलीतील प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठक घेतो, असे सांगितले होते; परंतु अधिकारीच फिरकले नाहीत. आरवलीतील समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
ग्रामस्थांची गैरसोय
महामार्ग चौपदरीकरणात कुंडाकडे ये-जा करण्याचा आणि कुंडावरून केदारनाथ मंदिरात जाण्याचा मार्गच बंद झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. कुंडातून बारमाही वाहणारे गरम पाणी नदीत सोडण्यासाठी मार्गच ठेवलेला नाही, असे भायजे यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:29 PM 04/Aug/2025














