पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) अर्ज प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी सुरू केलेली ई-केवायसी प्रक्रिया प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलली आहे. ई-केवायसी सुरू करण्यासाठी नवीन तारीख कालांतराने जाहीर केली जाईल, असे एमपीएससीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे. दरम्यान, एमपीएससीने अचानक निर्णय घेतल्याने उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
एमपीएससीच्या कोणत्याही भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने ई- केवायसी पूर्ण करणे अनिवार्य असणार आहे. अन्यथा, उमेदवाराचा अर्ज स्वीकारता जाणार नाही, असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
अर्ज स्वीकारण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली असणे बंधनकारक आहे. ही केवायसी प्रक्रिया एकदाच पूर्ण करावी लागणार असून, उमेदवाराचे एकच प्रोफाइल सक्रिय राहील तर अन्य खाती निष्क्रिय मानली जातील. त्यामुळे स्पर्धा परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसेल आणि पात्र उमेदवारांना योग्य संधी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
उमेदवारांनी वेळेवर ही प्रक्रिया पूर्ण करून परीक्षेच्या तयारीमध्ये कोणताही अडथळा येणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन आयोगाने केले आहे.
अनेक विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकांनी आयोगाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. या नवीन नियमानुसार, प्रत्येक उमेदवाराला आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर वन टाइम रजिस्ट्रेशन (ओटीआर) करून आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि इतर ओळखपत्राच्या आधारे केवायसी करावी लागणार आहे.
केवायसी करण्यासाठी वापरला जाणारा मोबाईल क्रमांक हा आधार क्रमांकाशी जोडलेला असणे आवश्यक आहे, अन्यथा ओटीपी न मिळाल्यास ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकणार नाही, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:47 PM 04/Aug/2025














