मुंबई : राज्याचे माजी मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांची सहाव्या राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी ही नियुक्ती केली आहे. यासंदर्भातील अधिसूचना गुरुवारी जारी करण्यात आली. आयोगाचे अध्यक्ष मुकेश खुल्लर यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली होती. खुल्लर यांची या पदावर १ एप्रिल २०२५ रोजी नियुक्ती करण्यात आली होती. परंतु या नियुक्तीनंतर जेमतेम तीन महिन्यात म्हणजेच ७ जुलै २०२५ रोजी त्यांचे आकस्मिक निधन झाले.
राज्य वित्त आयोग ही एक घटनात्मक संस्था आहे. पहिला राज्य वित्त आयोग सन १९९४ मध्ये स्थापन करण्यात आला. राज्य व केंद्र सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वित्तीय समतोल ठेवण्याची महत्त्वाची भूमिका राज्य वित्त आयोग निभावतो.
महाराष्ट्रात सहाव्या राज्य वित्त आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय मार्च २०२५ मध्ये राज्य सरकारने घेतला होता. त्यानंतर महिनाभराने खुल्लर यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. या आयोगाच्या शिफारशींचा अहवाल सादर करण्यासाठी राज्यपालांनी आयोगाला ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतची मुदत दिली होती. परंतु खुल्लर यांचे निधन झाल्याने नवनियुक्त अध्यक्ष डॉ. करीर यांना हा अहवाल सादर करण्यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:52 PM 04/Aug/2025














