रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या गॅस टँकर अपघातांची रत्नागिरी पोलिसांनी आता गंभीर दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी गॅस कंपन्यांचे अधिकारी, रस्ते कंत्राटदार, NHAI आणि RTO अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत अपघातांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी खालीलप्रमाणे महत्त्वपूर्ण सूचना दिल्या:
चालक आणि वाहनांसाठी नियम:
* टँकर चालकांची नियमित वैद्यकीय तपासणी करावी.
* चालकांना विशेष प्रशिक्षण द्यावे.
* गाडी चालवताना मोबाईलचा वापर पूर्णपणे टाळावा.
* दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.
* टँकरच्या ताफ्यात सुरक्षित अंतर राखले जाईल आणि वेग ताशी २० किमी पेक्षा जास्त नसेल याची खात्री करावी.
* चालकांना गणवेश देणे अनिवार्य करावे.
* प्रत्येक टँकरवर चालकासोबत एक मदतनीस असावा.
* चालकांची थकवा तपासणी (Fatigue Test) नियमितपणे करावी.
* टँकरच्या सुरक्षा व्हॉल्व्ह आणि चौकटी (Frames) मध्ये आवश्यकतेनुसार बदल करावेत.
* हातखंबा येथे बचाव वाहन (Rescue Vehicle) ठेवणे बंधनकारक असेल.
* बचाव पथकाला आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशिक्षण द्यावे.
NHAI आणि RTO साठी सूचना:
* रस्त्यावर आवश्यक त्या ठिकाणी सुरक्षिततेची चिन्हे लावावीत.
* रस्त्यांचे बांधकाम वेगाने पूर्ण करावे.
* घातक वळणे आणि उतारांवर स्पीड ब्रेकर्सचा वापर करावा.
* चालकांसाठी नियमित तपासणी शिबिरे आयोजित करावीत.
* टँकरची अचानक तपासणी (Surprise Checking) करावी.
* ओव्हरलोडिंग आणि दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.
जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या या तत्पर आणि महत्त्वपूर्ण निर्णयामुळे महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करत नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.













