रत्नागिरीत शाळकरी मुलांना ई-सिगारेट विकणाऱ्या दुकानदारावर पोलिसांची कारवाई; १.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त

रत्नागिरी (४ ऑगस्ट २०२५): विद्यार्थ्यांमध्ये ई-सिगारेटच्या वाढत्या व्यसनाकडे गंभीर लक्ष देत रत्नागिरी शहर पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. शहराच्या तेली आळी नाका येथील एका जनरल स्टोअरवर छापा टाकून पोलिसांनी तब्बल १ लाख ७२ हजार ५०० रुपये किमतीच्या ६९ ई-सिगारेट जप्त केल्या आहेत. या प्रकरणी दुकानाचा मालक गोविंद दिनेश गजरा याला अटक करण्यात आली असून, पोलिसांनी शाळा-कॉलेज परिसर तंबाखूमुक्त ठेवण्यासाठी कडक पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत.

विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांची धडक कारवाई

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील शाळकरी मुलांमध्ये कायद्याने प्रतिबंधित असलेल्या ई-सिगारेटच्या सेवनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. अनेकदा मुलांच्या दप्तरांमध्येही या सिगारेट सापडत होत्या. यामुळे चिंतित झालेल्या शाळांमधील शिक्षकांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत रत्नागिरी शहर पोलिसांनी ई-सिगारेट विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी एक विशेष पथक स्थापन केले.

आज, ४ ऑगस्ट २०२५ रोजी, या पथकाला गुप्त माहिती मिळाली की, तेली आळी नाका येथील जय गगनगिरी जनरल स्टोअरमध्ये ई-सिगारेटची विक्री सुरू आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ दुकानावर छापा टाकला. या कारवाईत दुकानाचा मालक गोविंद गजरा याच्याकडून १ लाख ७२ हजार ५०० रुपये किमतीच्या एकूण ६९ ई-सिगारेट जप्त करण्यात आल्या.

ही कारवाई इलेक्ट्रॉनिक्स सिगारेट प्रतिबंध (उत्पादन, निर्मिती, आयात, निर्यात, वाहतूक, विक्री, वितरण, साठा आणि जाहिरात) कायदा २०१९ कलम ७ व ८ नुसार करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षकांकडून तंबाखूमुक्त परिसराचे निर्देश

जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्री. बाबुराव महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. निलेश माईनकर आणि पोलीस निरीक्षक श्री. विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई पार पडली. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक श्री. सागर शिंदे, सपोफौ दीपक साळवी, पोहवा अमोल भोसले, आशिष भालेकर, पंकज पडेलकर, प्रशांत पाटील आणि पोकॉ अमित पालवे यांचा सहभाग होता.

दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सर्व शाळा-कॉलेज परिसरातील तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवरही कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. शाळांचा परिसर तंबाखूमुक्त ठेवण्यासाठी सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादन कायदा २००३ नुसार कारवाई केली जाणार आहे. पोलिसांनी नागरिकांना आणि शिक्षकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारची उत्पादने विक्री किंवा सेवन करताना आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, जेणेकरून विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी मदत होईल.