माझी शेती, माझा अभिमान’ उपक्रम कौतुकास्पद : मंत्री उदय सामंत

रत्नागिरी: शेतीबद्दलच्या आत्मसन्मानाला प्रोत्साहन देण्यासाठी ओंकार ॲग्रोटेक, रत्नागिरीने आयोजित केलेल्या ‘माझी शेती, माझा अभिमान’ या अभिनव उपक्रमाच्या बक्षीस वितरण समारंभास राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री, मा. ना. उदय सामंत यांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले.

शेतकऱ्यांचा संघर्ष आणि आत्मसन्मान

मंत्री सामंत यांनी या स्पर्धेचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “शेती हा आपल्या जगण्याचा मूलभूत आधार आहे. ही स्पर्धा केवळ कलागुणांना वाव देणारा कार्यक्रम नाही, तर कोकणातील शेतकऱ्यांच्या संघर्ष, सहनशीलता आणि आत्मसन्मानाचे प्रतिबिंब आहे.” कार्यक्रमात उपस्थित असलेल्या लोकांच्या एकजुटीची प्रशंसा करताना ते म्हणाले की, “आजचा कार्यक्रम जरी छोटा असला तरी त्यात असलेली भावना आणि एकजूट खूप मोठी आहे. महाराष्ट्रातली ही अभिनव स्पर्धा भविष्यात लाखो लोकांपर्यंत पोहोचेल, असा मला विश्वास आहे.”

कोकणातील शेतकरी आत्महत्या करत नाहीत…

या स्पर्धेत सहभागी झालेल्या कलाकारांनी कोकणातील शेतकऱ्यांच्या जीवनातील अनेक संवेदनशील विषय प्रभावीपणे मांडले. विशेषतः, “कोकणातील शेतकरी आत्महत्या करत नाहीत, कारण कोकणची माती सहनशील, संवेदनशील आणि संकटांवर मात करणारी आहे,” या मुद्द्याला ठामपणे अधोरेखित करण्यात आले. या विचारामुळे मंत्री सामंत प्रभावित झाले.

उपक्रमाच्या भविष्यासाठी सकारात्मक पाठिंबा

या उपक्रमाचे कौतुक करत मंत्री सामंत यांनी आयोजकांना पुढील वर्षासाठी एक महत्त्वाचा सल्ला दिला. “पुढील वर्षी तुम्ही विशिष्ट सामाजिक विषय देऊन स्पर्धा घेतलीत, तर कोकणातील ही स्पर्धा महाराष्ट्राच्या पातळीवरील सर्वात मोठा सांस्कृतिक उपक्रम होईल,” असे ते म्हणाले. यासोबतच, त्यांनी या उपक्रमाला आपला सकारात्मक पाठिंबा असेल असे आश्वासनही दिले.

आपले मनोगत व्यक्त करताना मंत्री सामंत म्हणाले की, “तुमच्या या सामाजिक जाणिवेचं आणि तरुणाईतून उगम पावलेल्या या उपक्रमाचं मी मनःपूर्वक कौतुक करतो. व्यवसायाबरोबर समाजकार्याची जाणीव असणाऱ्या अशा नव्या पिढीचा मला अभिमान आहे.”