गुहागर : या देशात सोन्याचा धूर निघत होता. यामुळे या देशाला लुटण्यासाठी अनेक आक्रमणे झाली; परंतु ही आक्रमणे केवळ सोने-चांदीची लूट करण्यासाठी नाही तर हिंदू संस्कृतीची, धर्माची लूट करण्याचाही त्यांचा उद्देश होता. मात्र साधुसंतांची येथील आध्यात्मिक बैठक एवढी मजबूत होती की ते त्यांना शक्य झाले नाही, असे प्रतिपादन गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी केले.
अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने व अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ गुहागर तालुका त्यांच्या सहकायनि गुहागर शहरातील भंडारी भवन सभागृहामध्ये श्रावण भजन महोत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाची सुरुवात शहरातील श्रीदेव व्याडेश्वर मंदिरापासून ते कार्यक्रम स्थळापर्यंत टाळ मृदंगाच्या गजरामध्ये व हरिनामाच्या घोषामध्ये सवाद्य दिंडी काढण्यात आली. अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष भगवान बुवा लोकरे यांच्या हस्ते दिंडीचे पूजन करण्यात आले त्यानंतर आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी आयोजित कार्यक्रमात आ. जाधव म्हणाले, गुहागरसारख्या ठिकाणी एका छताखाली एका आयोजनाखाली तब्बल ३५ भजने सादर करण्यात येणार आहेत. भजनाची ही महती आणि परंपरा यातून कायम राखण्याचे काम केले जात असून, आपल्या देशाची संस्कृती, धर्म, रूढी व परंपरा टिकवून ठेवली जात आहे.
देशातील अनेक जाती-धर्माच्या संतांनी केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण जगभर प्रबोधन केले. हिंदू धर्माचे महत्त्व आणि या धर्माचे मन किती मोठे आहे हे संपूर्ण जगाला पटवून सांगितले. भजनातून देवाजवळ जाण्याचा व देवाला आपलेसे करण्याचा मार्ग आहे. भजन असू दे, नमन असू दे, जाखडी नृत्य येथील कलाकारांना शासकीय मानधन मिळवून देण्याचे भाग्य मला लाभले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:12 AM 05/Aug/2025














