चिपळूण : चिपळूण तालुक्यातील पूर्व भाग असलेल्या दसपटी सह्याद्रीच्या खोऱ्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू झाल्याचे पर्यावरण व निसर्गप्रेमींकडून निदर्शनास आणले जात आहे. नुकतेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्प अंतर्गत दसपटी खोरे परिसरात चार पट्टेरी वाघांचा वावर असल्याचे स्पष्ट झाले असतानाच व्याघ्र प्रकल्पानजिकच सह्याद्री खोऱ्यात खासगी वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात सुरू असलेली वृक्षतोड निसर्ग व पर्यावरणप्रेमींच्या नजरेत आली आहे. त्यातूनच निसर्ग व पर्यावरणप्रेमींकडून जंगल वाचविण्यासाठी अभियान सुरू करण्याचा मनोदय व्यक्त होत आहे.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प अंतर्गत चिपळूण तालुक्याचा पूर्व पट्टा अर्थातच दसपटी खोरे म्हणून ओळखले जाते. खेड तालुक्यातील पंधरागावपासून थेट दसपटी खोरे, कोयना अभयारण्यापर्यंत पसरले आहे. हा संपूर्ण पट्टा व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येतो. सुमारे महिनाभरापूर्वी या व्याघ्र प्रकल्पांतर्गत सह्याद्रीच्या खोऱ्यात अर्थात दसपटी खोऱ्यानजिकच चार पट्टेरी वाघ असल्याचे वन खात्याने स्पष्टीकरण दिले; मात्र या वाघांचा वावर कुठल्या क्षेत्रात आहे याची स्पष्ट ओळख सांगितली नाही. असे असताना सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व दसपटी खोऱ्यासहीत वन्यजिवांना आवश्यक वनसंपदेचे रक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे; मात्र गेल्या काही दिवसांपासून खासगी वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू असल्याचे निसर्गप्रेमींनी समाज माध्यमांद्वारे निदर्शनास आणले आहे. पर्यावरण व निसर्गप्रमींतून वृक्षतोडीबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
प्रामुख्याने वालोटी, आकले आदी परिसरात जंगलतोडीनंतर मोठ्या प्रमाणात लाकडांचे ढिगारे रचून ठेवल्याचे दिसून येत आहेत. वन्यजीव कायद्यानुसार पावसाळी हंगामात कोणत्याही प्रकारच्या जंगलामध्ये मानवी हस्तक्षेप करता येत नाही. तसेच लाकूडतोड अधिनियम १९६४ नुसार खासगी जमिनीतील तोड करण्यासाठभअटी व शर्तीनुसार परवानगी घ्यावी लागते; मात्र पावसाळी हंगामात कुठुही वृक्षतोड करता येत नाही. असे असताना जंगलतोड प्रकरणी कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 AM 05/Aug/2025














