रत्नागिरीत कावड यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद

रत्नागिरी : सकल हिंदू समाजातर्फे प्रथमच आयोजित कावड यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. कावड यात्रा गयाळवाडी, मरूधर विष्णू समाज स्वामीनगर येथून सुरू झाली. पारंपरिक वेशभूषा व खांद्यावर कावड घेऊन यात्रा निघाली. या कावडमध्ये विविध नद्यांचे पवित्र जल आणण्यात आले होते. त्यानंतर राजिवडा येथील श्री काशीविश्वेश्वराला जलाभिषेक करण्यात आला. पुढील वर्षी मोठ्या उत्साहात कावड यात्रा काढण्याचा संकल्प करण्यात आला.

कावड यात्रेला सकाळी ७ वाजता सुरवात झाली. त्यानंतर कुवारबाव, साळवी स्टॉप, मारुती मंदिरमार्गे जेल नाक्यावरून (कै.) अरुअप्पा जोशी मार्ग, गोगटे कॉलेज येथून काशीविश्वेश्वर मंदिरात कावड यात्रा पोहोचली. कावडमध्ये विविध पवित्र नद्यांचे जल आणले होते. यामध्ये हरिद्वार येथील पवित्र गंगानदी, प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावरील जल, नर्मदा व चंद्रभागा, त्र्यंबकेश्वर येथील जल, स्थानिक नद्या काजळी व लोटेश्वर आणि बावनदी येथील जल संकलित करून कावडमध्ये भरले होते.

यात्रेत पारंपरिक गीते लावली होती. गीतांवर नृत्य करत प्रवास केला. भगवे ध्वज फडकत होते. भगव्या रंगाच्या टोप्या, पारंपरिक पांढरा झब्बा, अशा वेशात कावड घेऊन अनेक लोक यात्रेत सहभागी झाले. कावड यात्रेत जवळपास १०० कावड होत्या. या सर्व कावडमधून काशीविश्वेश्वर देवावर जलाभिषेक करण्यात आला. यात्रेचे पहिलेच वर्ष होते, तरीही भरपूर प्रतिसाद मिळाला

यांनी घेतली मेहनत…
मरुधर विष्णू समाजाचे दीपक देवल, कांतिलाल मालवीय, चुन्नीलाल माळी, फत्तेसिंह राठोड, नरपतसिंह परिहार, विरम सिरवी आदींनी ही यात्रा यशस्वी होण्याकरिता मेहनत घेतली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 AM 05/Aug/2025