रत्नागिरी : ई-पॉस’द्वारे अनुदानित रासायनिक खत विक्री अनिवार्य

रत्नागिरी : सर्व किरकोळ रासायनिक खत विक्रेत्यांना आता अनुदानित रासायनिक खतांची विक्री ई-पॉस प्रणालीद्वारे करणे बंधनकारक केले आहे. खतांच्या विक्रीची नोंद तत्काळ आणि अचूक पद्धतीने प्रणालीमध्ये समाविष्ट करणे आवश्यक असून, या नियमांचे पालन न करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई होऊ शकते, असे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून सांगण्यात आले.

खत विक्रेत्यांकडे असलेले ई-पॉस मधील खत आणि प्रत्यक्ष गोदामातील खताचा साठा यात कोणतीही तफावत असू नये. यासाठी रासायनिक खतांच्या विक्रीची नोंद एफएमएस (आयएफएमएस) प्रणालीमध्ये वेळेत भरणे बंधनकारक आहे. या नियमांचे पालन केले जात आहे की नाही, हे तपासण्यासाठी क्षेत्रीयस्तरावर खत निरीक्षकांना नियमित तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

ज्या विक्रेत्यांकडे ई-पॉस आणि प्रत्यक्ष साठ्यात फरक आढळेल, त्यांच्या परवान्यावर नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचना परवाना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ज्या विक्रेत्यांनी अद्याप नवीन एल एक सिक्युरिटी ई-पॉस मशीनचा वापर सुरू केलेला नाही, त्यांनी १० ऑगस्टपूर्वी कार्यालयाशी संपर्क साधून ती मशीन प्राप्त करून अंमलबजावणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:36 AM 05/Aug/2025