चिपळूण : परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थी प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमात राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी ग्रामपंचायत अधिकाऱ्याविरोधात अवमानकारक, असभ्य आणि धमकी देण्याचे वक्तव्य केले. या विरोधात संतापलेल्या चिपळूण तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले.
परभणी जिल्ह्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर चिपळूण तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सोमवारी सकाळी गटविकास अधिकारी उमा घार्गे-पाटील यांना काळ्या फिती लावून निवेदन दिले. त्यानुसार प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्यातील ग्रामपंचायत प्रामाणिकपणे व निष्ठेने कामकाज करीत आहे.
या कामगिरीमुळेच महाराष्ट्र राज्याला केंद्र सरकारमार्फत या योजनेतील उकृष्ठ कामगिरीचा सन्मान मिळाला आहे. यावरून ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे कामकाज दिसून येते. तरीदेखील राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी जिंतूर तालुक्यातील लाभार्थी प्रमाणपत्र वाटपात अवमानकारक वक्तव्य केले. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी (ता. ४) काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले. राज्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देताना ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे अध्यक्ष मंगेश पिंगळे व पदाधिकारी, तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:51 AM 05/Aug/2025














