स्मार्ट मीटरप्रकरणी जनहित याचिका दाखल करणार : बाळा कदम

चिपळूण : मुख्यमंत्री व उर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतरही जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रारी करण्याबरोबरच न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा उद्धव ठाकरे शिवसेनेचे चिपळूण विधानसभा क्षेत्र प्रमुख बाळा कदम यांनी दिला.

लोकांचा विरोध झुगारून तसेच जबरदस्ती करून ठेकेदार घरात स्मार्ट मीटर बसवत आहेत, याबाबत अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. त्यामुळे त्यांना धडा शिकवण्यासाठी जनआंदोलन उभारण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, आम्ही प्रथम सर्वपक्षीयांनी एकत्र येऊन बैठक घेतली. केवळ चिपळूण तालुक्याचा विचार करता चार हजाराहून अधिक घरांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. मात्र हे बसवताना अनेक ग्राहकांना विश्वासात घेतले नाही.

विशेष म्हणजे हा मीटर बसवल्यानंतर पूर्वी सरासरी ५०० रुपये येणारे वीजबिल तब्बल अडीच हजारापर्यंत पोहोचले आहे. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात आपण स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सक्ती करणार नाही, असे जाहीर केले होते. मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी वीज कंपनी व संबंधित ठेकेदाराची माणसे कोणालाही विश्वासात न घेता या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवत आहेत.

केवळ आंदोलन उभारून कोणताही फायदा होणार नाही. हा प्रकार मोडीत करण्यासाठी जनहित याचिका दाखल करणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांनी तयारी करूया. आता कोल्हापूर खंडपीठ सुरू झाले आहे. त्यामुळे त्याचा फायदा घेऊन या ठिकाणी जनहित याचिका दाखल करता येऊ शकते. त्यादृष्टीने पदाधिकाऱ्यांनी अभ्यास करावा आणि पुढील निर्णय घ्यावा. आंदोलन सुरूच राहील. मात्र, त्यासाठी ठोस निर्णय म्हणून जनहित याचिका दाखल करणे गरजेचे आहे. यासाठी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी मान्यता दिली असल्याचे कदम यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:07 AM 05/Aug/2025