चिपळूण पालिकेत प्रधानमंत्री आवास योजने’साठी स्वतंत्र कक्ष

चिपळूण : येथील नगरपालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहरात सर्वसामान्य नागरिकांना घरकुलाचा लाभ मिळावा यासाठी बांधकाम विभागात स्वतंत्र कक्ष सुरू केला आहे. नागरिकांनी कुठल्याही एजंट किंवा प्रलोभनाला बळी पडू नये. सदनिका मिळवून देण्यासाठी पैशांची मागणी केल्यास त्याची माहिती योजनेच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना कळवावी. तसेच संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

केंद्र शासनाने सप्टेंबर २०२४ मध्ये प्रधानमंत्री आवास योजना २.० ची घोषणा केली. या योजनेत वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधकाम, भागीदारी तत्त्वावर परवडणारी घरे, भाडेतत्त्वावर परवडणारे घरे, व्याज अनुदान योजना आदी घटकांचा समावेश केला आहे. आवास योजनेची (शहरी) अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र शासनाने एक युनिफाईड बेब पोर्टल तयार केले आहे. त्या पोर्टलवर लाभार्थ्यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. नागरी भागातील लोकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी याचा उपयोग होणारा आहे. यामध्ये लाभार्थ्यांची निवड प्रथम करावयाची असल्याने युनिफाईड वेब पोर्टलवर जास्तीत जास्त लाभार्थ्यांची माहिती भरावी. अर्ज भरलेल्यांना परवडणारी घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. लाभार्थी कुटुंबामध्ये, पती-पत्नी व अविवाहित मुले, मुली (१८ वर्षांखालील) यांचा समावेश आहे.

असे आहेत निकष
आवास योजनेंतर्गत अनुदान घेण्यासाठी शहरी भागात राहणाऱ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर देशात कोणत्याही भागात पक्के घर नसावे. लाभार्थ्यांनी गेल्या २० वर्षांत कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा, असे निकष आहेत. या योजनेचा नागरिकांना लाभ देण्यासाठी चिपळूण पालिकेने स्वतंत्र कक्ष सुरू केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 AM 05/Aug/2025