गोवळकोट, पेठमाप बौद्धवाडीच्या स्मशानभूमी संदर्भातील अन्नत्याग आंदोलनाला चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समितीचा सक्रिय पाठिंबा जाहीर

चिपळूण : चिपळूण शहरातील गोवळकोट कदमवाडी, तारा व सुभेवाडी तसेच पेठमाप व पेठमाप रोड अशा पाच बौद्धवाड्यांच्या स्मशानभूमीचा प्रश्न तसेच इतर मूलभूत सुविधांचे प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित आहेत.

त्याकडे शासन पूर्णतः दुर्लक्ष करत असल्यामुळे शासन प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्ट रोजी पुकारण्यात आलेल्या अन्नत्याग आंदोलनाला चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती चिपळूण -स्थानिक व मुंबई यांच्या वतीने सक्रिय पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.

पाच बौद्धवाड्यांच्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नासंदर्भात पुकारण्यात आलेले आंदोलन अतिशय महत्त्वाचे असून शासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे . येथील पाचही वाड्या या चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती या संस्थेच्या शाखा असलेल्या वाड्या आहेत. त्यामुळे संस्था नेहमीच त्यांच्यासोबत राहणार आहे. त्या पार्श्वभूमीवर संस्थेच्या स्थानिक व मुंबई कमिटीतील कार्यकर्त्यांनी तातडीने चर्चा करून ग्रामस्थांनी पुकारलेल्या या अन्नत्याग आंदोलनाला सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच या आंदोलनाला तालुक्यातील सर्व लोकांनी सक्रिय पाठिंबा द्यावा, असे आवाहन संस्थेच्या मुंबई मुख्य कमिटीचे अध्यक्ष विठोबादादा पवार, सरचिटणीस हरिश्चंद्र पवार तसेच संस्थेचे स्थानिक अध्यक्ष चंद्रकांत सावंत, सरचिटणीस संदेश पवार यांनी केले आहे.

या पाच बौद्ध वाड्यांच्या स्मशान भूमीचा प्रश्न निकाली काढण्यात यावा, तसेच वाड्यांच्याकडे जाणाऱ्या रस्त्यांचे रुंदीकरण व्हावे , नदीकाठी संरक्षक भिंत घालावी तसेच इतर मूलभूत सोयीसुविधा तातडीने पुरवल्या जाव्यात, अशा काही प्रमुख मागण्या आंदोलनाच्या निमित्ताने करण्यात आलेले आहेत. या संदर्भात संबंधित ग्रामस्थांनी चिपळूण नगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाशी पत्रव्यवहारही केलेला आहे. मात्र अद्यापही त्यासंबंधी दखल न घेतल्याने त्यांना आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागलेला आहे. ग्रामस्थांचे हे प्रश्न सुटावेत यासाठी संस्थेच्या वतीने शासन प्रशासनाची संपर्क साधून प्रयत्न केला जाणार आहे. तसेच संस्थेचे मुंबई अध्यक्ष विठोबादादा पवार यांनी जिल्हा प्रशासनाशी चर्चा करून लवकरात लवकर मार्ग काढण्याची मागणी केली आहे. १५ ऑगस्ट पूर्वी हा प्रश्न सोडवला गेला नाही तर तो अधिक गंभीर होऊ शकतो, याची प्रशासनाने दखल घ्यावी आणि तत्पूर्वी हे प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. आजही जिल्ह्यातील अनेक गावात बौद्धवाडीच्या स्मशानभूमीचे प्रश्न तसेच मूलभूत सोयी सुविधांचे प्रश्न प्रलंबित आहेत. अनेक गावात स्वतंत्र स्मशानभूमी उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक लोकांची गैरसोय होत आहे. या बाबीकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष वेधणे गरजेचे आहे. त्यासाठी माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतंत्र स्मशानभूमीच्या संदर्भात तातडीने आदेश काढून हे प्रश्न सोडवावे, अशी भूमिका संस्थेचे अध्यक्ष तथा रत्नागिरी जिल्हा बौद्धजन महासंघाचे अध्यक्ष विठोबा पवार यांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 05-08-2025