मंडणगड : मुंडे महाविद्यालयात स्वच्छ सर्वेक्षण कार्यक्रम संपन्न

मंडणगड : येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या कर्मवीर भि. रा. तथा दादा इदाते वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय व लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२५ अभियान अंतर्गत पंचायत समिती मंडणगड येथील अधिकाऱ्यांनी भेट दिली.

यावेळी पंचायत समिती गट विस्तार अधिकारी सुनिल खरात, गटशिक्षणाधिकारी सौ. कल्याणी मुळे, विस्तार अधिकारी श्रीकांत बापट (शिक्षण), विस्तार अधिकारी राजेंद्र मोहिते(ग्रा. पं.), विषय शिक्षक नागराज चापळकर, प्रा. अशोक कंठाळे, प्रा. महादेव वाघ, प्रा. प्राची कदम, प्रा. साई पवार आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे स्वागत प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर यांच्या हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी प्रा. अशोक कंठाळे यांनी सदर स्वच्छ सर्वेक्षणाबाबत प्रास्ताविक करुन त्यामागील उद्देश स्पष्ट केला. विस्तार अधिकारी श्री. राजेंद्र मोहिते यांनी अस्वच्छतेचे आरोग्यावर होणारे विविध दुरगामी दुष्परिणाम, मानवाचे घटते आयुर्मान याबाबत माहिती देताना विद्यार्थी हा या मोहिमेचा केंद्रबिंदू समजून विद्यार्थ्यांना स्वच्छतेविषयी मार्गदर्शन केले. एक विद्यार्थी हा एका गावाचे प्रतिनिधीत्व करु शकतो. तसेच स्व्च्छतेची मोहिम ही प्रत्येक घरापासून सुरु झाल्यास संपूर्ण देश स्वच्छ होण्यास मदत होईल असे सांगितले. तसेच स्वच्छ सर्वेक्षण प्रश्नवलीविषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली.

गटविकास अधिकारी सुनिल खरात यांनी स्वच्छतेमध्ये आपला सहभाग अमूल्य असून ही एक आपली सांघिक जबाबदारी आहे. ती पार पाडण्यासाठी आपण कटिबध्द राहूयात असे आवाहन केले. अध्यक्षीय समारोप करताना प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर यांनी सांगितले की, स्वच्छ सर्वेक्षण अभियानाला महाविद्यालयाकडून सर्व प्रकारची मदत करण्यात येईल. महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी या मोहिमेत सहभाग घेऊन मोहिम यशस्वी करावी. कार्यक्रमाला शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. प्राची कदम यांनी तर आभार प्रा. महादेव वाघ यांनी मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 05-08-2025