पाली : मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नाणीज येथील जुना मठ येथे झालेल्या अपघातानंतर पळून गेलेल्या डंपर चालकाला पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले. लीलाधरी महादेव सॉ (२०, रा. रोहनियातंड झुमरीतलया, जि. कोडरमा, झारखंड) असे संशयित डंपर चालकाचे नाव आहे.
ही घटना गुरुवारी (ता. १९) सकाळी साडेआठच्या सुमारास नाणीज जुना मठ येथे घडली. मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून वेल्डिंगच्या कामासाठी पालीच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीवरील दोघांना नाणीज जुना मठ येथे डंपरने पाठीमागून धडक दिली होती. यात अपघातातील दुचाकीवरील तरुण अरुण अनंत दरडी (वय ३५), रामचंद्र देवजी दरडी (६५, रा. दरडीवाडी नाणीज) यांचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर पाली पोलिस दूरक्षेत्राबाहेर शेकडो ग्रामस्थ एकवटल्यामुळे वातावरण तंग होते. या अपघातानंतर दिवसभर या महामार्गावरील नाणीज, पाली, हातखंबा, खेडशी यांसह विविध ठिकाणांच्या सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले. डंपरचालकाचा शोध घेण्यासाठी नाणीज, पाली परिसरातील ग्रामस्थांनीही पुढाकार घेतला.