पावस चौकात ट्रक बंद पडल्याने वाहतूक कोंडी

पावस : रत्नागिरी ते नाटे सागरीमार्गावरील पावस चौकामध्ये एक मालवाहू ट्रक बंद पडल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. सुमारे दोन तासानंतर वाहतूक सुरळीत झाली.

पावस परिसरामध्ये सागरी कवच अभियान सुरू असल्यामुळे या परिसरामध्ये अनेक ठिकाणों नाकाबंदी करण्यात आली होती. त्याप्रमाणे पावस चौकामध्ये नाकाबंदी करण्यात आली. तिथून जाणाऱ्या सर्वच वाहनांची तपासणी केली जात होती. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास रत्नागिरीवरून पूर्णगडमार्गे मालवाहू ट्रक जात होता. त्या ट्रकचे डिझेल संपल्यामुळे चौकात बंद पडला. त्यामुळे वाहतूककोंडी झाली. वाहनांच्या रांगाच्या रांगा लागलेल्या होत्या. त्यामुळे पोलिसांना नाकाबंदीऐवजी बंद पडलेल्या ट्रकमुळे झालेल्या कोंडीतील वाहतूक सुरळीत करण्यास सुरवात करावी लागली. दोन तासानंतर संबंधित ट्रकचालकाने डिझेल आणले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. या प्रकारामुळे वाहनचालकांमधून नाराजी व्यक्त केली जात होती. गाडीतील डिझेल संपत आले असतानाही चालकाने हलगर्जीपणा केला होता. त्याचा फटका वाहनचालकांना बसला. वाहतूककोंडी करणाऱ्या चालकाविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. घडलेल्या या प्रकारामुळे वाहनचालकांनी रस्त्यावर वाहन आणण्याआधी त्याची देखभाल दुरुस्ती करावी अशी अपेक्षा आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 AM 18/Oct/2024